

asia cup team india yashasvi jaiswal down in icc mens t20 batting rankings
यशस्वी जैस्वाल हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रतिभावान खेळाडू आहे. मुंबईचा हा युवा क्रिकेटर अवघ्या 23 वर्षांच्या वयातच जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत आहे. या डावखुरा फलंदाजाने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
असे असूनही, निवडकर्त्यांनी यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघात त्याची निवड झालेली नाही. अशातच त्याला दुहेरी झटका बसला आहे. ताज्या टी-20 क्रमवारीत त्याची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (10 सप्टेंबर) नवीन क्रमवारी जाहीर केली. पुरुषांच्या टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याचे 829 रेटिंग आहे. तिलक वर्मा 804 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव हा टॉप-10 मध्ये असलेला तिसरा भारतीय खेळाडू आहे, तो 739 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे.
यापूर्वी दहाव्या स्थानावर असलेल्या यशस्वी जैस्वालला एका स्थानाचा फटका बसला आहे. तो आता 11व्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग 673 आहे. त्याला आपली क्रमवारी सुधारण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यशस्वी जैस्वाल गेल्या काही काळापासून भारताच्या टी-20 संघातून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 30 जुलै 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या वर्षीच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 23 वर्षीय यशस्वीचा भारतीय संघात समावेश नव्हता.
आतापर्यंत 23 टी-20 सामन्यांमध्ये, या डावखुऱ्या फलंदाजाने 36.15 च्या सरासरीने 723 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट 164.31 राहिला आहे. त्याच्या नावावर एक शतक आणि 5 अर्धशतके आहेत.