

मुंबई : भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र, नुकताच एक मोठा खुलासा झाला आहे की, जैस्वाल त्याचा मुंबई रणजी संघ सोडण्याच्या विचारात होता. परंतु, कर्णधार रोहित शर्माने त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला.
भारतीय संघाचा प्रतिभावान सलामीवीर यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपल्या दमदार कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो संघाचा एक अविभाज्य भाग आहे. तथापि, या वर्षाच्या सुरुवातीला त्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (MCA) अनौपचारिक 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) देखील मिळवले होते.
मात्र, रोहित शर्माच्या सांगण्यावरून त्याने आपल्या निर्णयापासून माघार घेतली, अशी माहिती खुद्द मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, ‘रोहितने यशस्वीला कारकिर्दीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई संघातच राहण्याचा सल्ला दिला. त्याने यशस्वीला समजावून सांगितले की, ४२ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईसारख्या संघाकडून खेळणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. मुंबई क्रिकेटमुळेच तुला प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आणि तू भारतीय संघात स्थान मिळवू शकलास, ही गोष्ट विसरू नकोस. त्यामुळे तू आपल्या संघाचा आणि एमसीएचा आदर केला पाहिजे.’ अशीही रोहितने त्याची कानउघडणी केली.
जैस्वालने मुंबईकडून २०१९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द प्रभावी राहिली आहे.
प्रथम श्रेणी (First-Class) : ४३ सामन्यांमध्ये ६६.५८ च्या सरासरीने ४,२३३ धावा केल्या आहेत, ज्यात १५ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २६५ आहे.
लिस्ट ए (List A) : ३३ सामन्यांमध्ये ५२.६२ च्या सरासरीने १,५२६ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि ७ अर्धशतके आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०३ आहे.
कसोटी (Test) : भारताकडून २४ कसोटी सामन्यांमध्ये ५०.२० च्या सरासरीने २,२०९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतके आणि १२ अर्धशतके आहेत. नाबाद २१४ ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
एकदिवसीय (ODI) : एका एकदिवसीय सामन्यात त्याने १५ धावा केल्या आहेत.
टी-२० (T20) : २३ टी-२० सामन्यांमध्ये ३६.१५ च्या सरासरीने ७२३ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे.