

azmatullah omarzai star of afghanistan in asia cup 2025
दुबई : अफगाणिस्तानने आशिया कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगला पराभूत केले. या विजयाचा शिल्पकार हा असा खेळाडू ठरला, जो एकेकाळी तालिबानच्या भीतीने संध्याकाळ होण्यापूर्वीच क्रिकेट खेळणे बंद करायचा. या खेळाडूचे नाव आहे अजमतुल्लाह ओमरजई.
तालिबानच्या दहशतीने अजमतुल्लाह ओमरजई याचे बालपण जखडून टाकले होते. भीतीच्या सावटामुळे तो मनमुरादपणे क्रिकेट खेळायलाही धजावत नव्हता. मात्र, कठीण परिस्थितीला सामोरे जात त्याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली भक्कम छाप उमटवली आहे.
लहानपणी गावात क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात जाणं हे ओमरजईसाठी मोठं आव्हान होतं. तालिबानी दहशतवाद्यांचा धाक इतका होता की, ‘जर त्यांनी पाहिलं तर शिक्षा करतील’ या भीतीमुळे तो खेळण्यापासून स्वतःला रोखत असे. तरीही क्रिकेटबद्दलच्या ओढीमुळे त्याने ही भीती बाजूला सारत कसेबसे खेळणे सुरू ठेवले.
हळूहळू स्थानिक क्रिकेटमधून त्याचा खेळ खुलत गेला आणि त्याने देशांतर्गत स्तरावर स्वतःला सिद्ध केलं. पुढे त्याची अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. आज ओमरजई हा संघाचा प्रमुख अष्टपैलू ठरत असून बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग या तिन्ही आघाड्यांवर तो महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आशिया कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
अजमतुल्लाह ओमरजईने हाँगकाँगविरुद्ध अफगाणिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपण संघाचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू का आहे, हे सिद्ध केले.
अजमतुल्लाह ओमरजई जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा अफगाणिस्तानची स्थिती बिकट होती. त्यांचे ४ महत्त्वाचे फलंदाज १०० धावांच्या आत तंबूत परतले होते. अशा परिस्थितीत ओमरजईने धैर्य आणि चतुराई दाखवत आकर्षक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आधी विकेटवर स्थिरावून नंतर आपल्या खेळीचा वेग वाढवला आणि फक्त २१ चेंडूत ५३ धावा तडकावल्या. या वादळी खेळीत त्याने ५ षटकार खेचले. त्याचा स्ट्राइक रेट २५२ पेक्षा जास्त होता. सेदिकुल्लाहसोबत मिळून त्याने पाचव्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
फलंदाजीनंतर ओमरजईने गोलंदाजीमध्येही हाँगकाँगच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अफगाणिस्तानने हाँगकाँगसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण प्रत्युत्तरात ते फक्त ९४ धावाच करू शकले आणि त्यांचे ९ फलंदाज बाद झाले. हाँगकाँगच्या या खराब कामगिरीमागे एक मोठे कारण अजमतुल्लाह ओमरजई देखील होता. त्याने केवळ १ बळी घेतला नाही, तर २ षटकांत ९ चेंडू निर्धाव टाकून फक्त ४ धावा दिल्या.