

दुबई : गतविजेता भारतीय संघ आज यजमान यूएईविरुद्धच्या सामन्याने आशिया चषक मोहिमेला सुरुवात करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. दुसरीकडे, यूएईचे खेळाडू मोठा धक्का देण्यास सज्ज आहेत. उभय संघातील ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 8 पासून खेळवली जाणार आहे.
याव्यतिरिक्त, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांसारख्या गुणवान युवा फलंदाजांच्या समावेशामुळे संघाला अधिक बळ मिळाले आहे. श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना संघातून वगळले गेले, हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल, त्याला अर्शदीप सिंगची साथ मिळेल, तर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे मनगटी फिरकी गोलंदाज संघाची ताकद वाढवतील.
दुसरीकडे, यूएईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर आत्मविश्वासाने खेळत आहे आणि बलाढ्य भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघात अनेक स्टार खेळाडू असल्यामुळे आणि संघातील अव्वल खेळाडूंचा ताफा पाहता त्यांनाच विजयाचा स्पष्ट दावेदार मानले जात आहे. मात्र, स्थानिक समर्थकांचा पाठिंबा आणि टी-20 क्रिकेटमधील अनिश्चिततेच्या जोरावर यूएई मोठा उलटफेर नोंदवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल.
यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावर प्रभावी कामगिरी करून आश्चर्याचा धक्का देणार का, याचीच या लढतीत उत्सुकता असेल. कर्णधार मोहम्मद वसीम फलंदाजीचा मुख्य आधार असेल आणि तोच डावाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. अलिशन शराफू आणि आसिफ खान मधल्या फळीत त्याला साथ देतील. आर्यंश शर्मा आणि राहुल चोप्रा हे दोन यष्टिरक्षक फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.
यूएईच्या गोलंदाजीमध्येही युवा आणि अनुभवी खेळाडूंचा बर्यापैकी उत्तम मिलाफ आहे. मुहम्मद जवादुल्ला आणि जुनैद सिद्दीकी हे प्रमुख वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने अडचणी निर्माण करू शकतात. यूएईची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांना दुबईतील खेळपट्टी आणि वातावरणाची उत्तम माहिती आहे. येथील संथ खेळपट्ट्या आणि दव सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम करतात.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.
यूएई : मोहम्मद वसीम (कर्णधार), हैदर अली, आर्यंश शर्मा (यष्टिरक्षक), राहुल चोप्रा (यष्टिरक्षक), अलिशन शराफू, आसिफ खान, मतिउल्लाह खान, सिमरनजित सिंग, इथन डिसोझा, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवादुल्ला, हर्षित कौशिक, मुहम्मद रोहिद, जुनैद सिद्दीकी, सगीर खान, मुहम्मद जोहैब, ध्रुव पराशर.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क
यंदाच्या सुरुवातीला जेव्हा भारताने दुबईत एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, तेव्हा त्यांनी वापरलेल्या खेळपट्टीवर चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. मात्र, आशिया चषकासाठी खेळपट्ट्या ताज्या आणि अधिक वेगवान असण्याची शक्यता आहे. यामुळे संघांना अधिक संतुलित गोलंदाजी आक्रमणाची गरज भासू शकते आणि जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी दुसर्या विशेष वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा लागू शकतो. वर्षाच्या या काळात असलेली प्रचंड उष्णता दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीची खरी कसोटी घेईल.
1 : यूएई आणि भारत यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत केवळ एकच सामना झाला आहे. 2016 च्या आशिया चषकात झालेल्या या सामन्यात भारताने यूएईचा नऊ गडी राखून पराभव केला होता.
24 : मागील टी-20 विश्वचषक सुरू झाल्यापासून भारतीय संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 विजय आणि केवळ 3 पराभवांची नोंद केली आहे.