

दुबई : आशिया चषक स्पर्धेला आजपासून (९ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना अबू धाबी येथे अफगाणिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात उद्या, बुधवारपासून (१० सप्टेंबर) करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १४ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.
आशिया चषक स्पर्धेमध्ये एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांना प्रत्येकी ४-४ च्या दोन गटांमध्ये विभागले आहे. ‘अ’ गटामध्ये भारत आणि पाकिस्तानसह ओमान आणि यूएई या संघांचा समावेश आहे. तर ‘ब’ गटामध्ये गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हॉंगकॉंग हे संघ आहेत.
स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी सर्व संघांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आशिया चषक स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत तब्बल १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी, २०२२ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये श्रीलंकेने आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले तेव्हा त्यांना सुमारे १.६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. तर, पाकिस्तानला उपविजेता म्हणून ७९.६६ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली होती. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना अनुक्रमे सुमारे ५३ लाख आणि ३९ लाख रुपये मिळाले होते.
पीटीआयच्या माहितीनुसार, २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता आशियाई क्रिकेट परिषदेने यावेळी बक्षिसाची रक्कम वाढवली आहे. २०२२ च्या टी-२० आशिया चषकाच्या तुलनेत, यावर्षी विजेत्यासाठी बक्षिसाची रक्कम २.६ कोटी रुपये करण्यात आली आहे, ही रक्कम मागील आशिया चषकाच्या बक्षिसापेक्षा सुमारे १ कोटी भारतीय रुपयांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे, उपविजेत्या संघाला १.३ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, वृत्तसंस्थेनुसार, मालिकावीराला स्पर्धेच्या शेवटी १२.५ लाख रुपयांची रक्कम प्रदान केली जाईल.