

दुबई : क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आशिया चषक स्पर्धेचा बिगुल वाजला आहे आणि उत्साह शिगेला पोहोचला आहे. स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत एक मोठे विधान केले आहे. ‘आम्ही पाकिस्तानविरुद्ध आक्रमक क्रिकेट खेळू. मैदानावर भीतीला वाव नाही.’ सूर्याच्या या विधानानंतर १४ सप्टेंबर रोजी खेळला जाणारा हा महामुकाबला रंगतदार होईल यात शंका नाही.
टीम इंडिया पूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे. रणनीती स्पष्ट आहे. प्रत्येक चेंडूवर दबाव, प्रत्येक षटकात आक्रमण. आशिया कप हा नेहमीच उपखंडातील क्रिकेट प्रतिस्पर्ध्याचा आखाडा राहिला आहे. परंतु यावेळी दावे खूप जास्त आहेत. नवीन खेळाडूंचा आत्मविश्वास, वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव आणि सूर्यकुमार यादवची आक्रमकता, हे सर्व एकत्रितपणे भारत-पाकिस्तान सामना ऐतिहासिक बनवू शकते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळाडू आक्रमकता कमी करतील असा प्रश्न विचारल्यावर सूर्याने हलक्या फुलक्या पाक संघाला इशारा दिला. तो म्हणाला, ‘आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सूर्या म्हणाला, मैदानात उतरल्यावर आक्रमकता नेहमीच कायम असते. आक्रमकतेशिवाय क्रिकेट खेळता येत नाही, असे स्पष्ट करत त्याने संघाच्या तयारीबद्दल सांगितले की, जूननंतर जरी संघाने टी-२० सामने कमी खेळले असले तरी, आयपीएलमधील खेळाडूंची कामगिरी आणि अलीकडील नेट प्रॅक्टिसमुळे संघ पूर्णपणे तयार आहे. आम्ही आव्हान स्वीकारतो. बघूया कसं होतं ते.’
याच प्रश्नावर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला, ‘जर कोणाला आक्रमक व्हायचे असेल तर तो त्याचा निर्णय आहे. माझ्या संघाबद्दल बोलायचं झाल्यास, मी कोणालाही कोणतेही निर्देश देत नाही.’
भारतीय संघ स्पर्धेची सुरुवात बुधवारी यजमान युएईविरुद्धच्या सामन्याने करेल, तर पाकिस्तानचा पहिला सामना शुक्रवारी (दि. १२) ओमानविरुद्ध होईल.
संघाच्या रणनीतीत काही बदल होईल का, असे विचारले असता भारतीय कर्णधार सूर्याने एक मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘सध्या सगळं काही चांगलं सुरू आहे. याचा अर्थ, जर सर्व काही योग्य चालू असेल तर बदल का करायचा.’
भारतीय प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचा युएई संघ कमकुवत मानला जात असला तरी, भारतीय कर्णधार म्हणाला की आम्ही यजमान संघाला हलक्यात घेणार नाही. ते उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहेत आणि नुकतेच तिरंगी मालिकेत त्यांनी काही अटीतटीचे सामने खेळले आहेत. आशा आहे की ते आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करतील.’
रोहित शर्माच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव भारताचा पूर्णवेळ कर्णधार बनला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने २२ पैकी १७ सामने जिंकले आहेत, हे एक उत्कृष्ट आकडेवारी आहे. आशिया चषक हा सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची पहिला ‘मल्टी-नॅशनल’ स्पर्धा आहे. त्यामुळे ही स्पर्धा त्यांच्यासाठी एक मोठी परीक्षा ठरेल.