

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानविरुद्ध प्रभावी ठरलेला नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बाजिद खान याने व्यक्त केली आहे. त्यानी सांगितले की, सूर्यकुमारने जवळपास सर्वच संघांविरुद्ध धावा जमवल्या आहेत, पण पाकिस्तानविरुद्ध मात्र तो फिका पडला आहे.
अगामी आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बोलताना बाजिद खान याने असेही नमूद केले की, ‘विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीची भारताला प्रकर्षाने जाणीव होईल. भारतीय संघ सक्षम आहे, पण काही दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो.’
पीटीव्ही स्पोर्ट्सवरील चर्चेत बाजिद खान म्हणाला, ‘भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा पाकिस्तानविरुद्ध विक्रम समाधानकारक नाही. त्याने जवळपास सर्व संघांविरुद्ध धावा केल्या आहेत; पण पाकिस्तानविरुद्ध तो परिणामकारक ठरलेला नाही. यामागे आमची वेगवान गोलंदाजी कारणीभूत असू शकते.’
आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघ आपला मोहिमेचा प्रारंभ 10 सप्टेंबर रोजी करणार आहे. 14 सप्टेंबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. त्यामुळे या महामुकाबल्यात भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर उत्तम कामगिरी करण्याची जबाबदारी असेल. तथापि, पाकिस्तानविरुद्ध सूर्याचे रेकॉर्ड काहीसे निराशाजनक आहे.
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 5 टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामने दुबईत, 1 सामना मेलबर्न येथे तर 1 सामना न्यूयॉर्क येथे खेळला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याची फलंदाजीची सरासरी 12.80 तर स्ट्राइक रेट 118.51 इतका आहे. भारतीय कर्णधाराने पाकिस्तानविरुद्ध एकूण 54 चेंडूत 64 धावा केल्या असून त्यात 7 चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.
टी-20 विश्वचषक 2021 (दुबई) : 8 चेंडूत 11 धावा
आशिया कप 2022 (ग्रुप स्टेज, दुबई) : 18 चेंडूत 18 धावा
आशिया कप 2022 (सुपर-4, दुबई) : 10 चेंडूत 13 धावा
टी-20 विश्वचषक 2022 (मेलबर्न) : 10 चेंडूत 15 धावा
टी-20 विश्वचषक 2024 (न्यूयॉर्क) : 8 चेंडूत 7 धावा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या 5 सामन्यांपैकी पाकिस्तानने 2 विजय मिळवले आहेत. 2021 च्या टी-20 विश्वचषकात तसेच 2022 च्या आशिया कप सुपर-4 टप्प्यात पाकिस्तानने भारतावर मात केली होती. तर भारताने 2021 आशिया कप ग्रुप स्टेजसह 2022 आणि 2024 टी-20 विश्वचषकात विजय मिळवला.
संपूर्ण आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत सूर्यकुमार यादवने 83 सामन्यांच्या 79 डावांत 38.20 च्या सरासरीने व 167.07 च्या स्ट्राइक रेटने एकूण 2598 धावा जमवल्या आहेत. त्याने आतापर्यंत 4 शतके झळकावली आहेत.