

suryakumar yadav makes strong comeback begins practice in nets
मुंबई : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा मैदानावर परतला आहे. जर्मनीमध्ये स्पोर्ट्स हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर, सूर्याने बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) सरावाला सुरुवात केली आहे. आगामी आशिया चषक स्पर्धेच्या दृष्टीने त्याची ही वापसी भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची वैद्यकीय टीम सूर्याच्या तंदुरुस्तीवर आणि वर्कलोडवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचा सराव हळूहळू वाढवला जाणार असून, 9 सप्टेंबरपासून सुरू होणार्या आशिया चषकापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांतील सूर्याची ही तिसरी मोठी शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी 2023 मध्ये घोट्याच्या आणि 2024 मध्येही स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेला त्याला सामोरे जावे लागले होते. या दुखापतींवर मात करून त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केल्याने संघ व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 717 धावा करत संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात 600 हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता.
या चमकदार कामगिरीसाठी त्याला ’प्लेअर ऑफ द सिरीज’ (मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर) पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतल्यास भारतीय संघाची मधली फळी आणखी मजबूत होईल. त्याच्या ’360-डिग्री’ फलंदाजीची जादू पुन्हा एकदा पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.