Suryakumar Yadav surgery : भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादववर लंडनमध्ये सर्जरी
Suryakumar Yadav surgery
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा टी-२० चा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर बुधवारी (दि.२५) दुपारी लंडनमध्ये स्पोर्ट्स हर्नियावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला हार्नियाचा त्रास जाणवत होता. त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याने बुधवारी शस्रक्रिया केली. शस्रक्रियेनंतर त्याने मी पूर्णपणे ठीक असून लवकरच भारतात परत येणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली.
सुर्यकुमारला गेल्या तीन महिन्यांपासून हार्नियाचा त्रास जाणवत होता. यासाठी त्याने मंगळवारी (दि.२४) लंडनमध्ये जाऊन तेथील डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर बुधवारी हर्नियावर शस्रक्रिया करण्यात आली. याआधी जानेवारी २०२४ मध्ये म्युनिकमध्ये त्याने अशीच सर्जरी केली होती. या सर्जरीमुळे त्याला १०- ते १२ दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्या टाचेला देखील शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सूर्यकुमार २०२५ च्या आयपीएलच्या सामन्यात शेवटचा खेळताना दिसला होता. या आयपीएल सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली होती. आयपीएलच्या १६ सामन्यात ६५.१८ च्या सरासरीने आणि १६७.९१ च्या स्ट्राईक रेटने ७१७ धावा करण्यात तो यशस्वी ठरला होता. त्याने आयपीएल हंगामात ६९ चौकार व ३८ षटकारच्या मदतीने ५ अर्धशतके झळकावली होती. भारताचे पुढचे टी-२० सामने ऑगस्ट २०२५ मध्ये होणार असून सुर्यकुमारला पुनरागमनासाठी खूप वेळ आहे.

