

Aryveer Sehwag U19 Asia Cup : २०२६ च्या १९ वर्षांखालील (U19) आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, आर्यवीर सहवाग याला 'सहवाग २.०' असे संबोधले जात आहे. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागचा मुलगा असलेल्या आर्यवीरला ही ओळख फारशी आवडलेली नाही. यामागील त्याने कारणही सांगितले आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आर्यवीर म्हणाला की, " माझी तुलना नेहमीच वडील वीरेंद्र सहवाग यांच्याशी केली जाईल. मी खूप आधीच हे स्वीकारले होते की, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाईल. हे अपरिहार्य आहे; याबद्दल मी काहीही करू शकत नाही. लोक तुलना करत असतील, तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे. हे वीरेंद्र सहवाग यांच्याबद्दल असणाऱ्या प्रेमाचेच प्रतीक आहे. पण मी 'सहवाग २.०' नाही; मी 'आर्यवीर सहवाग' आहे. मला 'दुसरा' सहवाग होण्यापेक्षा, पहिला 'आर्यवीर सहवाग' व्हायला जास्त आवडेल."
"मी स्वतःला कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या खेळाडूच्या चौकटीत बांधून घेतलेले नाही. मला फक्त परिस्थितीनुसार खेळायचे आहे. मी आधीही सांगितले आहे की, मी विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. संघाच्या गरजेनुसार खेळण्याचे माझे ध्येय असते."
१९ वर्षांखालील आशिया चषकात 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरलेल्या आर्यवीरने सांगितले की, "मला आनंद आहे की मी सुरुवातीच्या षटकांत फलंदाजी करू शकलो. ओमानमध्ये झालेल्या आशिया चषकात, सुरुवातीची १०-१५ षटके नेहमीच आव्हानात्मक होती; सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होत होता आणि नंतर तो फिरू (टर्न होऊ) लागला. ती खेळपट्टी बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारची होती. मला आनंद आहे की मी तिथे टिकून राहिलो आणि धावा काढू शकलो."
U19 आशिया कप स्पर्धेत आर्यवीरने ९०.२५ च्या सरासरीने एकूण ३६१ धावा केल्या. यामध्ये एक शतकी खेळी तर तीन अर्धशतकांचा समावेश आहे. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात सलामीवीर आर्यवीरने अर्धशतकी खेळी साकारली होती. या स्पर्धेत आर्यवीर 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला.