

चंदिगड; वृत्तसंस्था : पूर्ण हंगामात एककलमी वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्ध्यांचा धोबीपछाड करणार्या राजस्थान रॉयल्सची सद्दी अखेर गुजरात टायटन्सने संपुष्टात आणली आणि या हंगामातील आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. शतकवीर शुभमन गिल व सुदर्शनची दीडशतकी भागीदारी, हा या सामन्याचा खर्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. प्रारंभी, राजस्थानने 6 बाद 214 धावांचा डोंगर रचल्यानंतर गुजरातने तोडीस तोड प्रत्युत्तर देत 18.4 षटकांत 3 बाद 219 धावांसह सनसनाटी विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 215 धावांचे तगडे आव्हान असताना शुभमन गिल व सुदर्शन यांनी 12.5 षटकांत 167 धावांची तडाखेबंद सलामी दिली आणि येथेच गुजरातच्या विजयाची भरभक्कम पायाभरणी झाली. गिलने 53 चेंडूंत 15 चौकार व 3 षटकारांसह 104, तर सुदर्शनने 32 चेंडूंत 8 चौकार, 1 षटकारासह 58 धावांची दणकेबाज खेळी साकारत राजस्थानच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. साई सुदर्शन व शुभमन गिल नंतर अवघ्या 15 धावांच्या अंतरात बाद झाले असले, तरी त्यांनी केलेल्या भक्कम पायाभरणीमुळे गुजरातला विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यानंतर आणखी वेगळे प्रयास करावे लागले नाहीत. राहुल तेवातिया व जोस बटलर यांनी विजयाची औपचारिकता पार पाडली.
राजस्थानचा संघ हंगामात ज्या पद्धतीने झंझावाती वाटचाल करत होता, ते पाहता त्यांना रोखणे अशक्यप्राय असेल, अशीच स्पष्ट चिन्हे होती. मात्र, शुक्रवारी येथे झालेल्या दुसर्या क्वालिफायर लढतीत गुजरातने शुभमन गिल व सुदर्शन यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थानला मोक्याच्या लढतीत धूळ चारली आणि त्यांच्या वर्चस्वाला निर्णायक सुरुंग लावला.
राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीची 96 धावांची, तर गुजरातकडून शुभमन गिलची 104 धावांची खेळी लक्षवेधी ठरली. वैभव सूर्यवंशी प्रतिकूल वातावरणात 96 धावांची खेळी साकारण्यात यशस्वी जरूर झाला; पण शुभमन गिलने 104 धावांची धमाकेदार खेळी साकारत सुदर्शनच्या साथीने या सामन्याचे चित्रच पालटले.
यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात आता जेतेपदाच्या फैसल्याची घडी उभी ठाकली असून, उद्या (दि. 31) रोजी झळाळता चषक उंचावण्यासाठी आरसीबी व गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने भिडणार आहेत. ही लढत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे.
प्रारंभी, प्रतिकूल परिस्थितीतही वैभव सूर्यवंशी (47 चेंडूंत 96, रवींद्र जडेजा (नाबाद 45) व डोनोवन फेरेरा (11 चेंडूंत 38) यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 214 धावांचा डोंगर जरूर रचला. मात्र, अंतिमत: त्यांना अपयश सोसावे लागले. वैभवसह राजस्थानचा पूर्ण संघ यामुळे हताश झाला.