Usman Khawaja : ख्वाजाच्या सलग दुस-या शतकानंतर पत्नीचा आनंद गगनात मावेना! | पुढारी

Usman Khawaja : ख्वाजाच्या सलग दुस-या शतकानंतर पत्नीचा आनंद गगनात मावेना!

सिडनी; पुढारी ऑनलाईन : उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) सलग दुसऱ्या डावातील शतकामुळे ऑस्ट्रेलियाने चौथ्या ॲशेस कसोटी सामन्यात (ashes test) इंग्लंडसमोर विजयासाठी 388 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने बिनबाद 30 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अजून 358 धावांची गरज आहे. चौथ्या दिवशी जॅक क्रॉली 22 आणि हसीब हमीद 8 धावांसह खेळत आहेत. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 294 धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 113 धावा केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 4 बळी घेतले.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 12 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी मार्कस हॅरिसही 27 धावांची खेळी करून माघारी परतला. यावेळी संघाची धावसंख्या 52 होती. मार्नस लॅबुशेन 29 आणि स्टीव्ह स्मिथ 23 धावा करून बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 86 झाली.

यापुढे ऑस्ट्रेलियाचा डाव उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 179 धावांची जबरदस्त भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने 74 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. दुसरीकडे, उस्मान ख्वाजाबद्दल बोलायचे झाले तर त्याने सलग दुसऱ्या डावातही शतक झळकावले. ख्वाजाने (Usman Khawaja) 138 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली. त्याचे हे 10 वे शतक आहे.

ख्वाजाच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांचा दुसरा डाव 6 बाद 265 धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी 388 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जॅक लीचने 4 बळी घेतले. ख्वाजाने (Usman Khawaja) दुसऱ्या डावात शतक पूर्ण करताच सामना पाहण्यासाठी आलेली त्याची पत्नीही खूप आनंदी दिसत होती. ख्वाजाची पत्नी प्रेक्षकांच्या गॅलरीत उभी राहून टाळ्या वाजवताना दिसली. यावेळी तिच्या कुशीत लहान मुलही दिसले.

Back to top button