Hanuma Vihari : हनुमा विहारी ‘नो बॉल’वर आऊट? तिस-या पंचांवर चाहते संतापले (VIDEO) | पुढारी

Hanuma Vihari : हनुमा विहारी 'नो बॉल'वर आऊट? तिस-या पंचांवर चाहते संतापले (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे कर्णधार कोहली दुसऱ्या सामन्यात खेळत नाही आणि त्याच्या जागी केएल राहुल कर्णधारपद भूषवत आहे. विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारीचा (Hanuma Vihari) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने संथ सुरुवात केली. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. अग्रवाल २६ धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज पुन्हा फ्लॉप ठरले. पुजारा ३ धावा करून बाद झाला, तर रहाणे खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे उपाहारापर्यंत भारताला एकूण ५३ धावांपर्यंत ३ मोठे धक्के बसले. यावेळी केएल राहुल १९ आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) ४ धावा करून क्रीजवर होते. उपहारानंतर राहुलने विहारीसोबत संयमी खेळ केला आणि धावफलक हलता ठेवला. पण, ३९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रबाडाने विहारीला व्हॅन डर डुसेनकरवी झेलबाद केले. डुसेनने अप्रतिम झेल घेतला. ते पाहून विहारीही पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान विहारी शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला पण टीव्ही रिप्ले पाहिल्यावर रबाडाचा पाय बॉलिंग क्रिझच्या रेषेला स्पर्श करत असल्याचे दिसून आले.

त्यामुळेच चाहते विहारीला (Hanuma Vihari) कमनशीबी म्हणत आहेत. कारण तो ज्या चेंडूवर बाद झाला तो नो बॉल होता पण मैदानावरील पंच किंवा तिसऱ्या पंचांना नो बॉल दिसला नाही. सोशल मीडियावर पंचांच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.

त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या केएल राहुल शानदार अर्धशतकी आणि आणि आर अश्विनने ४६ धावांची खेळी खेळली. पण, त्या दोघांशिवाय दुसरा कोणताही फलंदाज मोठी खेळी साकारू शकला नाही. कशीबशी धावसंख्या २०० पार नेण्यात यश आले. (Hanuma Vihari)

Back to top button