Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या पोटात ‘गडबड’, म्हणून हनुम विहारी संघात! | पुढारी

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या पोटात ‘गडबड’, म्हणून हनुम विहारी संघात!

जोहान्सबर्ग; पुढारी ऑनलाईन : Shreyas Iyer : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे दुसरी कसोटी खेळली जात आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला. पाठदुखीमुळे विराट कोहली या कसोटीतून बाहेर पडला असून त्याच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापतग्रस्त विराटच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच जसप्रीत बुमराह जोहान्सबर्ग कसोटीत संघाचा उपकर्णधार असेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवेदनानुसार, पाठीच्या वरच्या भागात दुखापत झाली आहे. त्यामुळे नियमित कर्णधार कोहली या सामन्यात खेळत नाही. विराट संघाबाहेर असल्यामुळे हनुमा विहारीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, विहारीच्या जागी श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) निवड का करण्यात आली नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकून इतिहास रचला होता.

पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक करणारा तो पहिला भारतीय ठरला. अशा स्थितीत अय्यरला (Shreyas Iyer) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्यावर अनेकांना विश्वास होता. मात्र, त्याला संघातून वगळण्यात आले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे. संघ व्यवस्थापनाच्या माहितीनुसार श्रेयस अय्यरला  पोटाची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे त्याचा प्लेईंग इलेव्हनसाठी विचार करण्यात आला नाही. वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

बीसीसीआयने म्हटले आहे की, “अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने जसप्रीत बुमराहची दुसऱ्या कसोटीसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) पोटदुखीमुळे दुसऱ्या कसोटीच्या निवड शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वाँडरर्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नाही. कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची काळजी घेईल’, अशी माहिती देण्यात आली आहे.

श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १०५ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने ६५ धावा केल्या. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरी किवी संघाविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात त्याने १८ आणि १४ धावा केल्या. अय्यरने (Shreyas Iyer) आतापर्यंत दोन कसोटीत ५०.५० च्या सरासरीने २०२ धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, हनुमा विहारीने जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये शेवटची कसोटी खेळली होती. या कसोटीत दुखापत होऊनही त्याने संघाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विहारीने १६१ मिनिटे फलंदाजी करत आर अश्विनच्या साथीने भारताचा पराभव टाळला होता.

Back to top button