

कोलंबो, पुढारी ऑनलाईन : HBD इशान किशन या हॅशटॅगची सध्या चलती आहे. भारताचा आघाडीचा युवा क्रिकेटपटू ईशान किशनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहे. यापूर्वी त्याने मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात प्रवेश केला होता.
आपल्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इशान हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. तर क्रिकेटच्या इतिहासातील तो १६ वा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९९० मध्ये गुरशरण सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण हे काम केले होते.
आज श्रीलंकेविरुद्धच्ता एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव फिरकी हाताळत आहेत. जवळजवळ दोन वर्षानंतर दोघेही टीम इंडियामध्ये एकत्र आहेत. यापूर्वी एजबॅस्टन येथे २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत चहल आणि कुलदीप इंग्लंडविरुद्ध एकत्र सामना खेळले होते.
११४ दिवसांनंतर टीम इंडिया वन डेमध्ये मैदानात उतरली आहे. अखेरचा एकदिवसीय सामना मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर श्रीलंकेच्या संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आहे. जवळपास ४ वर्षांनंतर दोन्ही संघ एकमेकांविरुद्द्ग एकदिवसीय मालिका खेळत आहेत.
सूर्यकुमार यादवदेखील टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहे. त्याने मार्चमध्ये इशानबरोबर इंग्लंडविरुद्ध टी -२० सामन्यात प्रवेश केला होता. आता दोघेही एकत्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहेत. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड टीम इंडियाबरोबर आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. शिखर धवनला वयाच्या ३५ व्या वर्षी आणि २२५ दिवसांनी भारतीय वनडे संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाली आहे.
शिखर धवन हा भारताकडून कर्णधार पद भूषवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह तो एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणारा भारताचा २५ वा खेळाडू आहे.