SA vs IND Test : विराट, तू पत्रकार परिषदेत यायचं नाहीस, 'बीसीसीआय'चा कठोर निर्णय | पुढारी

SA vs IND Test : विराट, तू पत्रकार परिषदेत यायचं नाहीस, 'बीसीसीआय'चा कठोर निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ( SA vs IND Test) रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमुळे बीसीसीआय विरुद्ध विराट कोहली असा नवा वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका ( SA vs IND Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवार, २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी पत्रकार परिषद होणार आहे, मात्र कोहली त्यात येणार नाही, असे सूत्रांकडून समजते आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला पत्रकार परिषदेपासून दूर ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे एकटेच मीडियाला सामोरे जाणार आहेत.

SA vs IND Test : कसोटी मालिकेपूर्वी कोणताही वाद नको

भारतीय संघ व्यवस्थापनाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कोणताही वाद नको आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सुपर पार्क सेंच्युरियन कसोटीपूर्वी माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार असल्याचे वृत्त आहे. शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता ही पत्रकार परिषद होऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेमुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्याला टी-२० कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आल्याचे त्याने नाकारले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वी असे सांगितले होते की, त्याने स्वतः कोहलीला कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते.

विराटने पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याने बीसीसीआय अध्यक्षांना फटकारल्याचे स्पष्ट दिसले. यानंतर प्रश्न निर्माण झाला की, खरे कोण आणि खोटे कोण बोलतंय? या प्रकरणावर क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. हा वाद लक्षात घेऊन व्यवस्थापनाने कोहलीला द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहेत. मात्र, पुन्हा एकदा विराट कोहली आणि राहुल द्रविड मीडियासमोर कधी एकत्र येणार, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. आतापर्यंत कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक पत्रकार परिषदेत एकत्र दिसले नाहीत. यापूर्वी कोहली-शास्त्री यांनी अनेकदा एकत्र पत्रकार परिषद घेतली होती.
टीम इंडियाचा हा दौरा यापूर्वी 17 डिसेंबरपासून सुरू होणार होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला 4 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळायची होती. ओमायक्रॉनच्या वाढत्या संक्रमणामुळे संघाचे वेळापत्रक बदलण्यात आले. टी-20 मालिका पुढे ढकलण्यात आली. आता हा दौरा 26 डिसेंबर ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button