नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) पाकिस्तानचा पराभव करत ब्रांझपदक जिंकले. ढाका येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४ विरुद्ध ३ गोल फरकाने (IND vs PAK Hockey) रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.
सामन्याच्या तिस-याच मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी जास्त वेळ राहिली नाही आणि पाकिस्तानने लगेचच बरोबरी साधली. त्यांच्या अफराझने काउंटर अटॅकवर गोल केला. (IND vs PAK Hockey)
यानंतर पाकिस्तानने पुन्हा गोल करत आघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारताने अल्पावधीतच दोन गोल केले आणि टीम इंडियाने ४-२ अशी आघाडी घेतली. यानंतर पाकिस्तानने आणखी एक गोल आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सामना संपेपर्यंत त्यांना तीनच गोल करता आले. त्यामुळे त्यांना ४ विरुद्ध ३ गोल फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. (IND vs PAK Hockey)
टीम इंडियाकडून हरमनप्रीत सिंग तिस-या, सुमितने ४५ व्या मिनिटाला, वरुणने ५३ व्या मिनिटाला आणि आकाशदीपने ५७ मिनिटाला पाकिस्तानचे गोलजाळे भेदले. तर पाकिस्तानकडून अफराझने १०व्या, अब्दुल्ला राणाने ३३व्या आणि नदीमने ५७व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यासाठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.
या सामन्यापूर्वी भारताला जपानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या पराभवाचा टीम इंडियावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही आणि त्यांनी पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. यापूर्वी १७ डिसेंबरला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला होता.