Maradona Hublot watch : मॅराडोनाचे चोरीला गेलेले घड्याळ भारतातल्या ‘या’ राज्यात सापडले! | पुढारी

Maradona Hublot watch : मॅराडोनाचे चोरीला गेलेले घड्याळ भारतातल्या ‘या’ राज्यात सापडले!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अर्जेंटिनाचा दिवंगत दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे घड्याळ (Maradona Hublot watch) आसाममधून जप्त करण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. नोव्हेंबर २०२० मध्ये मॅराडोना यांचे निधन झाले. आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांसह आसामच्या चरैदेव जिल्ह्यातून मॅराडोनाचे चोरीचे घड्याळ जप्त केले असून या प्रकरणात वाजिद हुसेन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

आरोपी दुबईत कामाला होता…

आसाम पोलिसांचे डीजीपी म्हणाले की, फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे हब्लॉट कंपनीचे घड्याळ (Maradona Hublot watch) जप्त करण्यात आले आहे. हे घड्याळ दुबईतून चोरीला गेले होते. त्याची किंमत १९ लाखांच्या आसपास आहे. दुबई पोलिसांनी भारतीय फेडरल कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींमार्फत या प्रकरणात समन्वय साधला. यानंतर आसाम पोलिसांनी कारवाई केली. अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील आहे. तो दुबईमध्ये मॅराडोनाच्या वस्तू जतन करून ठेवणाऱ्या कंपनीत सिक्युरिटी म्हणून काम करत असे. ऑगस्ट २०२१ मध्ये तो भारतात परतला. ते पुढे म्हणाले की, पोलिसांना गुप्तचर माहिती मिळाली होती, ज्या अंतर्गत एका ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी वाजिद हुसैनला त्याच्या सासरच्या घरातून मोरनहाट भागात अटक केली.

मॅराडोना दोन्ही हातात घड्याळ असे… (Maradona Hublot watch)

मॅराडोना दोन्ही हातात घड्याळ बांधत असत. एक घड्याळ त्यांच्या मुलीने भेट म्हणून दिले. तेव्हापासून ते नेहमी दोन्ही हाताच्या मनगटावर घड्याळ बांधत असत. त्यांच्या हातातील दोन्ही घड्याळे सारखीच दिसत होती असं बोललं जायचं. मॅराडोनाने अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ९१ सामने खेळला. ज्यामध्ये त्यांनी ३४ गोल केले. तो १९८६ च्या विश्वचषकासह ४ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळला. १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत ते अर्जेंटिनाचे कर्णधारही होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच अर्जेंटीनाला एकमेव विश्वचषक़ स्पर्धा जिंकता आली. त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मॅराडोना यांना गौरविण्यात आले होते. मॅराडोना यांना फिफा प्लेयर ऑफ द सेंच्युरीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी एकदा वर्ल्ड कप गोल्डन बॉल, दोनदा बॅलोन डी’ओर, दोनदा साऊथ अमेरिकन फुटबॉलर ऑफ द इयर, नॅशनल लीग टॉप स्कोअरर असे विविध पुरस्कार जिंकले आहेत.

Back to top button