David Warner : ५ जीवदान मिळूनही डेव्हिड वॉर्नरला शतकाची हुलकावणी!

David Warner : ५ जीवदान मिळूनही डेव्हिड वॉर्नरला शतकाची हुलकावणी!
David Warner : ५ जीवदान मिळूनही डेव्हिड वॉर्नरला शतकाची हुलकावणी!
Published on
Updated on

ब्रिसबेन, पुढारी ऑनलाईन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस मालिकेचा दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर राहिला. सामन्यादरम्यान त्याला ५ जीवदान मिळाले, तरीही वॉर्नरला (David Warner) त्याचे शतक हुकले. ऑली रॉबिन्सनने ९४ धावांवर वॉर्नरला माघारी धाडले. बेन स्टोक्सने त्याचा झेल पकडला. त्याने आपल्या डावात १७६ चेंडूंचा सामना केला आणि ११ चौकार आणि २ षटकार ठोकले.

वॉर्नरला १७ धावांवर पहिले जीवदान मिळाले. त्यावेळी बेन स्टोक्स त्याच्या स्पेलचे पहिले षटक टाकत होता. वॉर्नर (David Warner) तिसऱ्या चेंडूवर बाद झाला, पण टीव्ही रिप्लेमध्ये स्टोक्सचा पाय गोलंदाजीच्या क्रीजच्या बाहेर असल्याचे दिसून आले. पंचांनी तो नो बॉल असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर ४९ धावांवर रॉरी बर्न्सने वॉर्नरचा झेल सोडला. हे त्याचे दुसरे जीवनदान होते.

त्यानंतर ६० धावांवर असताना तो धावबाद होताहोता थोडक्यात वाचला. हसीब हमीदने थ्रो केला, पण तो थेट विकेटवर आदळला नाही. फेकलेल्या चेंडूने विकेटचा वेध घेतला असता तर तो तंबूत परतला असता पण वॉनरचे दैव बलवत्तर असल्याने तो बाद झाला नाही. याशिवाय स्लिप आणि मिड-विकेटमध्ये वॉर्नरचे (David Warner) आणखी दोन झेल सुटले. अशा प्रकारे त्याला पहिल्या डावात आणि सामन्याच्या दुस-या दिवशी पाच जीवदान मिळाले. या जीवदानांच्याच जोरावर तो आपले २५ कसोटी शतक झळकावणार असे वाटत होते, पण रॉबिन्सने वॉर्नरचा खेळ संपुष्टात आणला आणि त्याला ९४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.

वॉर्नरचे (David Warner) ३१ वे अर्धशतक…

वॉर्नरने आपले ३१ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तीन धावा घेत ५० धावा पूर्ण केल्या. वॉर्नरने मार्कस लॅबुशेनसोबत दुस-या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारीही केली.

ऑस्ट्रेलियाकडे १९६ धावांची आघाडी…

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने १९६ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात ३८४ धावा केल्या. वॉर्नरशिवाय ट्रॅव्हिस हेडने ९५ चेंडूत ११२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार मारले. मार्नस लॅबुशेनने ११७ चेंडूत ७४ धावा केल्या.

इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांत गुंडाळला…

इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांत आटोपला. मात्र, पावसामुळे इंग्लंडचा डाव संपल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नव्हता. इंग्लंडकडून यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने ५८ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याच्याशिवाय ओली पोपने ३५ धावांचे योगदान दिले. इंग्लंडचे तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कर्णधार जो रूटशिवाय रॉरी बर्न्स आणि ऑली रॉबिन्सन एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतले.

पॅट कमिन्सचा 'पंजा'

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने ५ विकेट घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. कमिन्स प्रथमच ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. ६४ वर्षांनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा तो गोलंदाज आहे. कमिन्सने १३.३ षटकात ३८ धावा दिल्या. कमिन्स हा कर्णधार म्हणून पदार्पणातच पाच विकेट घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. जॉर्ज गिफेनने त्यांच्या १२७ वर्षांपूर्वी हा पराक्रम केला होता. दिवंगत वेगवान गोलंदाज गिफेनने १८९४ साली इंग्लंडविरुद्धच १५५ धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. कमिन्सशिवाय मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी २ बळी घेतले. तर कॅमेरून ग्रीनने १ बळी घेतला. मात्र, नॅथन लियॉनला विकेट घेता आली नाही आणि तो ४०० विकेट्स घेण्यापासून वंचित राहिला. त्याला ४०० विकेट्स घेण्यासाठी पुढील डावाची वाट पाहावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news