अखेर विराट कोहलीची उचलबांगडी; टी-२० नंतर आता वनडेमध्येही रोहित शर्माच कॅप्टन | पुढारी

अखेर विराट कोहलीची उचलबांगडी; टी-२० नंतर आता वनडेमध्येही रोहित शर्माच कॅप्टन

मुंबई; पुढारी ऑनलाईन

टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० प्रकारात आता रोहित शर्मा नियमित कर्णधार असेल. विराट कोहली एकदिवसीय कप्तानपदावरूनही उचलबांगडी करण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती होणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्याने टी-२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर दोन्ही प्रकारात (एकदिवसीय आणि टी-२०) वेगळे कर्णधार नेमल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम होईल, याची धास्ती बीसीसीआयला होती. त्यामुळे विराट कोहलीला बाजूला करण्याची चर्चा सुरु झाली.

वर्ल्डकपूर्वी दोन्ही प्रकारातील संघाची बांधणी करण्यासाठी रोहितला वेळ मिळावा, यासाठी रोहितकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे कसोटीमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितचीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वनडे आणि टी-२० नंतर कसोटीमध्येही विराटचा उत्तराधिकारी असेल यात शंका नाही.

विराट कर्णधार म्हणून अनेक विक्रमांनी गवसणी घातली, तरी त्याच्या नावावर आयसीसीच्या विजेतेपदाची नोंद नाही. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्येही विराट कोहलीचे अनेक निर्णय फसल्याने त्यांच्या नेतृत्वावरून अनेकांनी टीकेचा भडिमार सुरु केला होता.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

आता टीम इंडियाचे नवीन मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे, जो कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनमुळे सुमारे दहा दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होईल आणि त्यानंतर जानेवारीत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हनुमा विहारी संघात परतले आहेत. यासोबतच रोहित शर्माला वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. BCCI ने याची अधिकृत घोषणा आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे. कसोटी मालिकेसाठी विराट कर्णधार असून एकदिवसीय आणि टी २० साठी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका अशा वेळी होणार आहे जेव्हा दक्षिण आफ्रिका संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. 1970 मध्ये वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर आयसीसीने बंदी घातली होती. त्यानंतर 1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

कसोटी मालिकेसाठी संघ असा

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

स्टँडबाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अझरान नागवासवाला.

हे ही वाचलं का? 

Back to top button