ICC Men’s T20 World Cup : अफगाणची दिमाखात ‘सुपर-8’मध्‍ये एन्‍ट्री, न्‍यूझीलंड ‘आऊट’ | पुढारी

ICC Men's T20 World Cup : अफगाणची दिमाखात 'सुपर-8'मध्‍ये एन्‍ट्री, न्‍यूझीलंड 'आऊट'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T20 विश्वचषक 2024 स्‍पर्धेत आज दि. अफगाणिस्‍तानने पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव करत सुपर-8मध्‍ये प्रवेश केला. अफगाणिस्तान संघ क गटातून सुपर-8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. त्‍यामुळे न्‍यूझीलंड संघाचे यंदाच्‍या विश्‍वचषकातील आव्‍हान संपुष्‍टात आले आहे. या गटातून वेस्ट इंडिजचा संघ आधीच पात्र ठरला आहे.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर आज अफगाणिस्‍तान आणि पापुआ न्यू गिनी आमने-सामने होते. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पापुआ न्यू गिनी संघ 19.5 षटकांत केवळ 95 धावांपर्यंतच मजल मारु शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 15.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य साध्‍य करत क गटातून सुपर-8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे.

पापुआ न्यू गिनीची ९५ धावांपर्यंतच मजल, नायब आणि नबीची विजयी भागीदारी

प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीची सुरुवात खराब झाली. कर्णधार असद वाला तीन धावा करून बाद झाला. यानंतर टोनी उरा 11 धावा करून तंबूत परतला. लेगा सियाका आणि सेसे बाऊ यांना खातेही उघडता आले नाही. हीरी हीरी एक धाव घेत नवीन उल हकचा बळी ठरला. चाड सोपर (9 धावा) आणि नॉर्मन वानुआ (0) यांनाही विशेष काही करता आले नाही. दोघेही धावबाद झाले. किपलिन डोरिगा २७ धावा करत संघावर ओढावलेली नामुष्‍की दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला. सेम्मो कामियाने दोन धावा केल्या. जॉन कारिको चार धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर नवीन उल हकने दोन गडी बाद केले. नूर अहमदला एक विकेट मिळाली.

सेमो कामियाने इब्राहिम झद्रानला क्लीन बोल्ड केले. जादरनला खातेही उघडता आले नाही. अली नाओने रहमानउल्ला गुरबाजला क्लीन बोल्ड केले. गुरबाज सात चेंडूत 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नॉर्मन वानुआने नवव्या षटकात १३ धावांवर खेळणार्‍या अजमतुल्ला ओमरझाईला क्लीन बोल्ड केले. यानंतर गुलबदिन नायब आणि मोहम्मद नबी यांनी नाबाद 46 धावांची निर्णायक भागीदारी केली. नायबने 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 49 धावांवर त नबी 16 धावांवर नाबाद राहिला.

३७ वर्षानंतर न्‍यूझीलंड संघ विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या पहिल्‍या फेरीतून बाद

यंदाच्‍या टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत न्यूझीलंडचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला आहे. ३७ वर्षांनंतर वन-डे आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्‍ये पहिल्या फेरीतून बाहेर पडण्‍याची नामुष्‍की या संघावर ओढावली आहे. यापूर्वी १९८७ मध्‍ये वन-डे विश्वचषक स्‍पर्धेत न्‍यूझीलंडचा संघ पहिल्‍याच फेरीत गारद झाला होता. 1983 च्या एकदिवसीय विश्वचषकातही न्यूझीलंड पहिली फेरी पार करू शकला नव्‍हता.

T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेतील न्‍यूझीलंडची कामगिरी

2009, 2010 आणि 2012 टी-20 विश्वचषक स्पर्धेत किवी संघ सुपर-8 फेरीतून बाहेर पडला होता, तर 2014 मध्ये न्यूझीलंड संघ सुपर-10 फेरीत पोहोचला होता आणि सुपर-10 मध्ये पराभूत होऊन बाहेर पडला होता. 2007, 2016 आणि 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. तर 2021 मध्ये किवी संघ उपविजेता ठरला होता.

वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेतील न्‍यूझीलंड संघाची कामगिरी

न्‍यूझीलंडचा संघ वन-डे १९७५, १९७९, १९९२, १९९९, २००७, २०११ आणि २०२३ मध्ये उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता. तर 2015 आणि 2019 विश्‍वचषक स्‍पर्धेतचा उपविजेता ठरला आहे. १९९६ मध्ये संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर 2003 विश्‍वचषक स्‍पर्धेत सुपर-6 मध्ये पराभूत झाल्‍याने स्‍पर्धेतून बाहेर पडला होता.

 

 

Back to top button