Team India no 1 : मुंबई कसोटी जिंकल्यानंतर भारताची अव्वलस्थानी झेप! | पुढारी

Team India no 1 : मुंबई कसोटी जिंकल्यानंतर भारताची अव्वलस्थानी झेप!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India no 1 : मुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडियाने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सध्या भारताचे १२४ रेटिंग पॉइंट आहेत. तर न्यूझीलंडची दुस-या स्थानी घसरण झाली असून त्यांचे सध्या १२१ रेटिंग पॉइंट आहेत. किवी संघाने जून २०२१ मध्ये भारताकडून पहिले स्थान हिसकावले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ३७२ धावांनी विजय मिळवला. धावांच्या बाबतीत भारताचा हा आतापर्यंतचा कसोटीतील सर्वात मोठा विजय आहे.

Virat Kohli : विराट कोहलीची ‘वनडे’ कॅप्टनसी धोक्यात!, निवड समिती घेणार मोठा निर्णय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका सुरू झाली तेव्हा न्यूझीलंडचे १२६ रेटिंग पॉइंट होते. तर भारताचे ११९ रेटिंग पॉइंट होते. कानपूर येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताला रेटिंग पॉइंटमध्ये फायदा झाला आणि न्यूझीलंडला फटका बसला. मुंबई कसोटीतील पराभवानंतर न्यूझीलंडची रेटिंग पॉइंटमध्ये घसरण झाली आणि ते दुस-या क्रमांकावर पोहचले. २००९ मध्ये भारत पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा संघ बनला होता. तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) बद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाला फारसा फायदा झालेला नाही. यापूर्वीही भारत तिसऱ्या स्थानावर होता. आताही विराटचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाच्या गुणांची टक्केवारी ५८.३३ आहे. त्याच वेळी, संघाचे ४२ गुण आहेत. या वर्षीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने ३ सामने जिंकले आहेत. तर संघाला एक पराभव स्विकारावा लागला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचे सर्वाधिक ४२ गुण आहेत. तर श्रीलंका आणि पाकिस्तानचे २४ गुण आहेत. असे असले तरी टीम इंडिया दोन्ही संघांपेक्षा खाली आहे. कारण आयसीसीच्या नियमांनुसार ज्या संघाच्या गुणांची टक्केवारी सर्वाधिक आहे, तो संघ अव्वल स्थानावर असतो. श्रीलंकेच्या गुणांची टक्केवारी १०० आहे. तर पाकिस्तानच्या गुणांची टक्केवारी ६६.६६ आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ भारताच्या पुढे आहेत.

Back to top button