INDvsNZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिका घातली खिशात - पुढारी

INDvsNZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिका घातली खिशात

मुंबई : पुढारी ऑनलाईन

INDvsNZ Test : टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. भारताने न्यूझीलंडचा तब्बल ३७२ धावांनी पराभव केला. पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. पण दुसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडवर वर्चस्व मिळवत मोठा विजय संपादन केला. टीम इंडियाने किवी संघासमोर ५४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १६७ धावांत गुंडाळला.

टीम इंडियाने मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. भारताने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु किवी संघ केवळ १६७ धावांच करू शकला आणि सामना मोठ्या फरकाने गमावला. कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीतही हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे.

न्यूझीलंडची पडझड…

मुंबई कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ उपाहाराआधी न्यूझीलंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरली. झालेही तसेच. चौथ्या दिवशी न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. दिवसातील सातव्याच षटकात (एकूण ५१.५) जयंत यादवने पाहुण्या किवी संघाला सहावा झटका दिला. त्याने रचिन रविंद्रला (५० चेंडूत १८ धावा) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि तंबूचा रस्ता दाखवला. रवींद्र आणि हेन्री निकोल्स यांनी सहाव्या विकेटसाठी ९० चेंडूत ३३ धावांची भागीदारी केली. यावेळी किवी संघाची धावसंख्या ६ बाद १६२ होती. त्यानंतर जयंतने त्याच्या पुढच्याच षटकात पाहुण्यासंघाला दोन झटके दिले. ५४ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर काईल जेमिसनला (०) एलबीडब्ल्यू आणि टीम साउदीला (०) क्लिन बोल्ड करून माघारी धाडले. त्यानंतर पुन्हा एकदा ५५.१ व्या षटकात जयंत यादवच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. यावेळी बळी ठरला विल्यम सॉमरविलेला. त्याला अवघी १ धाव काढता आली आणि तो बाद झाला. मयंक अग्रवालने त्याचा झेल पकडला.

 

Back to top button