Ajaz patel : जन्माने मुंबईकर एजाजने भारताला मुंबईतच नाचवले ! न्यूझीलंडमध्ये हिरो कसा झाला ? | पुढारी

Ajaz patel : जन्माने मुंबईकर एजाजने भारताला मुंबईतच नाचवले ! न्यूझीलंडमध्ये हिरो कसा झाला ?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारतीय क्रिकेटची मक्का म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईने भारतासाठी अनेक क्रिकेटर दिले. या खेळाडूंनी जगभरातील संघांना पराभूत देखील केले. याच मुंबईमध्ये जन्म झालेल्या एजाझ पटेलने (Ajaz patel) भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले.

एजाझ पटेलच्या गोलंदाजीसमोर मयांक अग्रवालशिवाय कोणाही भारतीय फलंदाजाला त्याच्यासमोर निभाव लागला नाही. एजाझने सामन्यातील एकाच डावात 10 विकेट मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. भारतात असे करणारा तो पहिला विदेशी गोलंदाज बनला आहे. तो क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात 10 विकेट मिळवणारा केवळ तिसरा गोलंदाज बनला आहे. (Ajaz patel)

आपल्या आई वडिलासोबत 1996 मध्ये न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास गेलेल्या एजाझने भारताच्या पहिल्या डावात 47.5 षटकात 119 धावा देत 10 विकेट मिळवले. त्याने इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅनचेस्टर येथे सर्वात पहिल्यांदा दहा विकेट मिळवले होते. त्यांनी 51.2 षटकात 53 धावा देऊन 10 विकेट मिळवले.

कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध दिल्लीमध्ये फेब्रुवारीत 1999 मध्ये 26.3 षटकात 74 धावात 10 विकेट मिळवले. आपल्या कारकीर्दीतील 11 वा कसोटी सामना खेळणाऱ्या पटेलने मोहम्मद सिराजला बाद करत आपली दहावी विकेट मिळवली. भारतीय संघाने पटेलचे उभे राहून अभिवादन केले आणि पंचांनी देखील त्याला चेंडू दिला. पटेल आपल्या जन्मस्थानी भारताविरुद्ध खेळणाऱ्या डगलस जार्डीननंतर दूसरा क्रिकेटर ठरला. यापूर्वी न्यूझीलंडसाठी गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी ही दिग्गज रिचर्ड हॅडली यांनी केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1985 साली 52 धावांत नऊ विकेट मिळवले होते.

एजाझची ही कामगिरी संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट

एजाझची ही कामगिरी संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत होतो पण, त्याची ही कामगिरी विशेष आहे. त्याची ही कामगिरी पाहण्यासाठी मी मैदानावर नव्हतो याची खंत मला आहे. मला काही कामा निमित्त ऑफिसला जायचे होते. त्यामुळे त्याची कामगिरी मी टीव्हीवर पाहिली. गेल्या वर्षी आम्ही त्याच्या न्यूझीलंडच्या घरी गेलो होतो. तो मुंबईला आला तेव्हा मी त्याच्याशी बोललो. कसोटी सामन्यानंतर त्याची भेट घेण्याची योजना आहे असे एजाझचा चुलत भाऊ ओवेस पटेल म्हणाला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावपूर्वी एजाझचे कुटुंब हे भारतात सुटी घालवण्यासाठी येत असत. न्यूझीलंडचा माजी साथीदार मिचेल मॅक्लेघनच्या मदतीने तो आयपीएल सामने पाहण्यासाठी वानखेडेमध्ये येत असे.

Ajaz patel ची अशी सुरू झाली न्यूझीलंडमधील कारकीर्द

न्यूझीलंडमध्ये एजाझने आपली कारकीर्द ऑकलंडसोबत सुरू केले. पण, सेंट्रल डिस्ट्रिक्टस संघाकडून खेळताना त्याचे कौशल्य समोर आले. त्याने याच संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली सुरुवात केली.आणि 2012 मध्ये पदार्पण केले. त्याने याच वर्षी आपले टी 20 पदार्पण केले पण, 50 षटकांचे सामने खेळण्यासाठी त्याला आणखीन तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली. एजाजने स्थानिक स्तरावर चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आणि 2018 मध्ये त्याला न्यूझीलंडकडून खेळण्याची संधी मिळाली. संघातील स्थानासाठी त्याला मिचेल सँटनर आणि ईश सोढीची स्पर्धा होती पण, त्याने विकेट मिळवणे सुरूच ठेवले.

Ajaz patel च्या 10 विकेट

  • पहिली विकेट : एजाझने शुभमन गिलला बाद केले. त्याचा झेल रॉस टेलरने पकडला
  • दुसरी विकेट : 29 व्या षटकात एजाझने पुजाराला त्रिफळाचित करत भारताला दूसरा धक्का दिला.
  • तिसरी विकेट : 29 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचीत केले. या निर्णय विवादास्पद ठरला.
  • चौथी विकेट : श्रेयस अय्यरचा झेल हा टॉम ब्लंडेलने घेतला
  • पांचवी विकेट आणि सहावी विकेट : एजाझने सलग दोन चेंडूवर साहा (27) आणि अश्विनला बाद केले.
  • सातवी विकेट : भारतासाठी 150 धावांची खेळी करणाऱ्या मयंक अग्रवालला एजाझने बाद केले. मयंकचा झेल देखील ब्लंडेलने पकडला.
  • आठवी विकेट : अक्षर पटेलच्या (52) रूपात त्याने आठवी विकेट मिळवली. अक्षर पायचीत झाला
  • नववी आणि दहावी विकेट : जयंत यादव (12) आणि मोहम्मद सिराज (4) यांना बाद केले.

मुंबईमध्येच मी अशी कामगिरी करावी हे माझ्या नशीबात होते असे एकाच डावात 10 विकेट मिळवण्याची कामगिरी केल्यानंतर एजाझ पटेल म्हणाला. ही कामगिरी स्वप्नवत आहे आणि आपल्या कारकिर्दीत अशी कामगिरी करणे हे विशेष आहे. मुंबईतच ही कामगिरी करावी हे माझ्या नशीबातच होते. माझ्या कुटुंबासाठी देखील हा क्षण विशेष आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे माझे कुटुंब सोबत नाही.या कामगिरीमुळे मी कुंबळे सरांसोबत सहभागी झालो आहे. असे एजाझने सांगितले.

एजाज पटेल क्लबमध्ये तुझे स्वागत, परफेक्ट 10 चांगली गोलंदाजी. कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी करणे विशेष आहे. आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अनिल कुंबळे, माजी भारतीय गोलंदाज

गेल्या 15 वर्षात न्यूझीलंडसाठी काही चांगली कामगिरी पाहण्याची संधी मला मिळाली. एजाझची सामन्यातील कामगिरी ही विशेष आहे.
– सायमन डूल, न्यूझीलंडचे माजी गोलंदाज

क्रिकेटमध्ये सर्वात कठीण गोष्टीपैकी एक गोष्ट. एका डावात सर्व फलंदाजांना बाद करणे सोपे नाही. त्याची ही कामगिरी विशेष आहे.
रवि शास्त्री, माजी भारतीय प्रशिक्षक आणि गोलंदाज

एजाजची ही कामगिरी नेहमीच लक्षात ठेवली जाईल. ही कामगिरी अविस्मरणीय आहे.
हरभजन सिंग, भारतीय गोलंदाज

हेही वाचा : 

Back to top button