ind vs nz 2nd Test : वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कोहली आणि पुजारासाठी लाभदायक - पुढारी

ind vs nz 2nd Test : वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कोहली आणि पुजारासाठी लाभदायक

पुढारी ऑनलाईन डेस्क 

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत धावा करण्याची चांगली संधी आहे. रन मशिन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराटला २०१९ पासून कोणत्याही प्रकारात शतक करता आलेलं नाही. पुजाराला सुद्धा गेल्या तीन वर्षांपासून शतक झळकवता आलेलं नाही. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा सामना उद्या (ता.३ डिसेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी कर्णधार विराट कोहली आणि पुजारासाठी लाभदायक ठरली आहे.

वानखेडेवर कर्णाधार कोहली आणि पुजारा या दोन्ही फलंदाजांची धावांची सरासरी चांगली आहे. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना या मैदानावर उत्तम खेळ करण्याची चांगली संधी या सामन्याच्या निमित्ताने निर्माण झाली आहे.

खरं तर, गेल्या काही काळापासून कोहली आणि पुजारा मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कोहलीने नोव्हेंबर २०१९ नंतर कोणत्याही फॅार्मेटमध्ये (टेस्ट, वनडे, टी-२०) शतक करू शकलेला नाही. तर याबाबतीमध्ये पुजाराचे चित्र देखील काहीसे असेच आहे. चेतेश्वर पुजाराला गेल्या ३ वर्षात शतक करता आले नाही. या मैदानावर हे दोन्ही खेळाडू आपला धावांचा दुष्काळ दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करताना दिसतील.

दोन वर्षांपूर्वी केले होते कोहलीने शतक

कोहलीने २ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये बांग्लादेश विरूध्द डे-नाईट कसोटीमध्ये १३६ रनांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने एकूण ५० सामने ( २३ टी-२०, १५ वनडे आणि १२ कसोटी) खेळले आहेत. परंतु त्याला कोणत्याही फॅार्मेटमध्ये शतक करता आले नाही. मधल्या काळात कोहलीने टी-२० सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी केली होती.

तीन वर्षांपासून पुजारा शतकाच्या प्रतिक्षेत

कोहली सारखीचं काहीशी परिस्थिती पुजाराची आहे. पुजाराने आपले शेवटचे शतक २०१९ मध्ये केले होते. त्याने २३ टेस्ट खेळून त्याला शतक करता आले नाही. या काळात पुजाराने २८.७८ या सरासरीने धावा केल्या आहेत. पुजाराने कानपूर कसोटीमध्ये ८८ चेंडू खेळून २६ धावा केल्या होत्या. या सामन्यातील दुसऱ्या सत्रात देखील त्याला चांगल्या धावा करत्या आल्या नव्हत्या.

घरच्या मैदानावर ४ वर्षांपासून शतक करू शकला नाही

चेतेश्वर पुजाराला घरच्या मैदानावर चार वर्षांपासून शतक करता आलेलं नाही. पुजारा हा कसोटीतील सर्वोंत्तम खेळाडू मानला जातो. त्याने शेवटचे शतक नागपूरमध्ये नोव्हेंबर २०१७ रोजी श्रीलंका विरूध्द केले होते. त्यानंतर पुजाराने एकूण ६८ सामने खेळले. या दरम्यान त्याने विदेशात ४ शतक केले, पण त्याला भारतात शतक करता आले नाही.

वानखेडेवर कोहलीचे द्विशतक तर पुजाराची दोन शतके

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पुजाराची सरासरी चांगली आहे. पुजारा नंतर विराट कोहलीची सरासरी वानखेडेमध्ये चांगली आहे. पुजाराने आत्तापर्यंत वानखेडेवर तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ७५.२५ च्या सरासरीने त्याने दोन शतकांच्या सहाय्याने त्याने ३०१ धावा केल्या आहेत. १३५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर कोहलीने चार कसो़टी सामन्यात ७२.१६ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. या दरम्यान कोहलीने डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंड विरूध्द द्विशतक झळकवत २३५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा 

Back to top button