गुकेशच्‍या ‘बुद्धिबळ’वर कास्पारोवही अवाक; म्‍हणाले, “टोरंटोमध्ये भारतीय भूकंप” | पुढारी

गुकेशच्‍या 'बुद्धिबळ'वर कास्पारोवही अवाक; म्‍हणाले, "टोरंटोमध्ये भारतीय भूकंप"

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्‍या कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकत भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने इतिहास घडवला आहे. ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. ४० वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्ह यांचा विक्रम मोडून जागतिक विजेतेपदासाठी सर्वात तरुण आव्हानवीर ठरला आहे. त्‍याच्‍या या कामगिरीचे कास्‍पारोवही अवाक झाले. त्‍यांनी सोशल मीडियावर पोस्‍ट करत गुकेश याचे विशेष अभिनंदन केले आहे.

डी. गुकेशने घडविला इतिहास

कॅनडा, टोरंटो येथे बुद्धिबळ आव्हानवीर स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या एकूण आठ खेळाडूंमध्ये डबल राउंड रॉबिन पद्धतीने ही स्पर्धा झाली. या लढती मध्ये ९ गुणांसहित भारताचा डी. गुकेश याने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत २० फिडे गुणांची कमाई करत डी. गुकेशने जागतिक क्रमवारीत १० क्रमांकाने वर झेप घेतली. सहावे स्थान प्राप्त करत तो आता भारताचा प्रथम क्रमांकाचा खेळाडू देखील झाला आहे.

टोरंटोमध्ये भारतीय भूकंप…

कास्पारोव यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की. “अभिनंदन! टोरंटोमधील भारतीय भूकंप हा बुद्धिबळ जगतातील बदलत्या टेक्टोनिक प्लेट्सचा कळस आहे. कारण 17 वर्षीय गुकेश डीचा सर्वोच्च विजेतेपदासाठी चीनच्या चॅम्पियन डिंग लिरेनशी सामना होणार आहे. विशी विश्‍वनाथ आनंदची “मुले” आता सुसाट सुटली आहेत.”

गुकेश आहे विश्‍वनाथ आनंद यांचा शिष्‍य

भारतीय बुद्धिबळपटूंचे प्रेरणास्थान राहिलेल्या आणि पाच वेळेस बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकाविलेल्या विश्वनाथन आनंद यांचा गुकेश शिष्‍य आहे. गुकेशचे अभिनंदन करताना विश्‍वनाथ आनंद यांनी म्हटले की, “तू ज्या पद्धतीने खेळलास आणि पटावरील कठीण प्रसंग हाताळलेस याचा मला वैयक्तिक खूप अभिमान आहे. या आनंदी क्षणाची मजा घे.”

गुकेश ठरलाय जगातील सर्वात तरुण आव्‍हानवीर

१९५० मध्ये बुडापेस्ट येथे पहिल्या ‘बुद्धिबळ आव्हानवीर’ स्पर्धेपासून ७४ वर्षांच्या इतिहासात १७ वर्षीय डी. गुकेश हा सर्वात तरुण आव्हानवीर ठरला. सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता होण्याची देखील गुकेशला संधी आहे. जी गॅरी कास्पारोव आणि मॅग्नस कार्लसन या जगज्जेत्यांचा विक्रम मोडू शकेल.

हेही वाचा : 

 

 

Back to top button