Gukesh D : नाकामुराला बरोबरीत रोखले, गुकेश ठरला सर्वात तरुण बुद्धिबळ आव्हानवीर

File Photo
File Photo
Published on
Updated on

भारतीय बुद्धिबळपटूंचे प्रेरणास्थान राहिलेल्या आणि पाच वेळेस बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकाविलेल्या विश्वनाथन आनंदने प्रथम गुकेशचे (Gukesh D) अभिनंदन करताना म्हटले, "तू ज्या पद्धतीने खेळलास आणि पटावरील कठीण प्रसंग हाताळलेस याचा मला वैयक्तिक खूप अभिमान आहे. या आनंदी क्षणाची मजा घे."

कॅनडा, टोरंटो येथे बुद्धिबळ आव्हानवीर स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या एकूण आठ खेळाडूंमध्ये डबल राउंड रॉबिन पद्धतीने ही स्पर्धा झाली. या लढतीमध्ये ९ गुणांसह डी. गुकेश (Gukesh D) याने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत २० फिडे गुणांची कमाई करत डी. गुकेशने जागतिक क्रमवारीत १० क्रमांकाने वर झेप घेतली. सहावे स्थान प्राप्त करत तो आता भारताचा प्रथम क्रमांकाचा खेळाडू देखील झाला आहे.

१९५० मध्ये बुडापेस्ट येथे पहिल्या 'बुद्धिबळ आव्हानवीर' स्पर्धेपासून ७४ वर्षांच्या इतिहासात १७ वर्षीय डी. गुकेश (Gukesh D) हा सर्वात तरुण आव्हानवीर ठरला. सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता होण्याची देखील गुकेशला संधी आहे. जी गॅरी कास्पारोव आणि मॅग्नस कार्लसन या जगज्जेत्यांचा विक्रम मोडू शकेल.

दुसऱ्या पटावर विजयाच्या दृष्टीने अनुकूल पटस्थिती निर्माण झालेली असताना देखील, करूआना यास नेपोम्नियाची विरुद्ध विजय साकारता आला नाही. १०९ चालींपर्यंत चाललेल्या डावात नेपोम्नियाची याने करूआनाला बरोबरीत रोखले आणि डी. गुकेश याचा आव्हानवीर होण्याचा मार्ग टाय-ब्रेक विना सुकर झाला.

अंतिम १४ व्या फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या हिकारू नाकामुराने पांढऱ्या मोहऱ्यांसहित खेळताना 'क्वीन्स गॅम्बिट' ओपनिंगला पसंती दिली. गुकेशने त्यास 'क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेड' ने प्रत्युतर दिले. ७ व्या आणि ८ व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी कॅसलिंग करून राजा सुरक्षित करण्यास प्राधान्य दिले. काळ्या मोहऱ्यांसहित खेळताना गुकेशने आपली सर्व मोहरी सक्रिय करण्यावर प्रथम भर दिला. २० व्या चालीस गुकेशने वजीराच्या सहाय्याने नाकामुराचे डी-४ घरातील प्यादे टिपले. येथे गुकेशने डावावर पकड घेतली. २४ व्या चालीस गुकेशने वजीरा- वजीरीचा प्रस्ताव नाकारून 'वजीर एफ-४' ही चाल खेळणे अपेक्षित होते. डावाच्या मध्यात गुकेश अचूक चाली निश्चित करत होता. परंतु मोहरा मोहरी करून डाव बरोबरीत सोडविण्याकडेच कल अधिक दिसला. डावाच्या अंतिम टप्प्यात गुकेश याने आपल्या हत्ती व उंटाच्या विविध चालीने आपली परिपक्वता सिद्ध केली. पूर्ण डावात नाकामुराला गुकेशने वरचढ होऊ दिले नाही. दोन्ही खेळाडूंचे केवळ राजे पटावर बाकी असताना ७१ चाली नंतर पाच तास चाललेला हा डाव बरोबरी निकालाने संपला.

आता सर्वांचे लक्ष होते करूआना – नेपोम्नियाची डावा कडे. 'क्वीन्स गॅम्बिट डिक्लाईन्ड' पद्धतीत झालेला हा डाव खूपच थरारक झाला. डावाच्या मध्यातच पांढऱ्या मोहऱ्यांसहित खेळताना करूआनाने डावावर वर्चस्व प्राप्त केले. केवळ पहिल्या २४ चालींमध्ये विजयाच्या दृष्टीने करूआना वाटचाल करताना दिसले. मात्र ३९ व्या चालीस 'उंट सी-२' चाल करणे अपेक्षित असताना, करूआना याने 'उंट एच-७' चाल केली. यामुळे डावावरील पकड ढिली होणार होती. डाव पुढे सरकत असताना करूआनाच्या चाली अचूक होणे गरजेचे होते. मात्र ५९ व्या चालीस हत्तीची चाल चुकीची ठरली. डावाच्या अंतिम टप्प्यात दोन्ही खेळाडू आपल्या प्याद्याचे रूपांतर वजीरामध्ये करण्यात यशस्वी झाले. या डावामध्ये विशेष कौतुक नेपोम्नियाची याचे करावेसे वाटते. त्याने आपला सर्व अनुभव पणास लावून १०९ चालीपर्यंत चाललेल्या या डावात करूआना यास बरोबरीत रोखले. मात्र या निकालाने गुकेश याचा डिंग लिरेन (चीन) या जगजेत्याचा आव्हानवीर होण्याचा मार्ग टाय-ब्रेक विना सुकर झाला.

'किंग्ज इंडियन डिफेन्स' पद्धतीत झालेल्या डावात प्रज्ञानंद याने अबासोव विरुद्ध छान विजय साकारला. तर फिरोझा- विदित यांनी केवळ १४ चालींमध्ये आपल्या वजीराच्या चालींची पुनरावृत्ती करत बरोबरी मान्य केली. हिकारू नाकामुरा, इयान नेपोम्नियाची आणि करूआना यांचे समान साडेआठ गुण झाले.

(लेखक बुद्धिबळ अभ्यासक आहेत)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news