नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीचा संघ निवडण्यासाठी निवड समितीप्रमुख अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे बैठक घेणार आहेत आणि त्यात इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील कामगिरीवर चर्चा होईल, त्यावर आधारित संघ निवड केली जाईल; पण तत्पूर्वी, दिनेश कार्तिकने संघ निवडीपूर्वी डोकेदुखी वाढवणारा दावा केला आहे. जर त्यांनी माझा विचार केला, तर मी या आव्हानासाठी 100 टक्के तयार आहे, असे त्याने म्हटले आहे.
ऋषभ पंतच्या कामगिरीवर सर्वांची बारीक नजर आहे; कारण अपघातातून सावरल्यानंतर तो प्रथमच मैदानावर उतरला आहे. त्याने 7 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 210 धावा केल्या आहेत. त्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाजांच्या शर्यतीत तो आहे; पण तो एकटा नाही. त्याला आव्हान देण्यासाठी इशान किशन (7 सामन्यांत 192 धावा), लोकेश राहुल (7 सामन्यांत 286 धावा), संजू सॅमसन (7 सामन्यांत 276 धावा) हे आहेतच; परंतु यात आता 39 वर्षीय दिनेश कार्तिकनेही दावा केला आहे.
कार्तिकने 7 सामन्यांत 205.45च्या स्ट्राईक रेटने 226 धावा चोपल्या आहेत. तो म्हणाला, आयुष्याच्या या वळणावर, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे यापेक्षा आनंदी गोष्ट माझ्यासाठी कोणती असू शकत नाही. मी 100 टक्के त्यासाठी तयार आहे. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी मी माझे सर्वस्व द्यायला तयार आहे.
संघ व्यवस्थापनातील तीन सर्वोत्तम लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. अजित आगरकर, रोहित शर्मा व राहुल द्रविड आणि त्यांच्या निर्णयावर. जर त्यांनी माझा विचार केला, तर मी या आव्हानासाठी 100 टक्के तयार आहे, असेही तो म्हणाला. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात कार्तिकची फटकेबाजी पाहून रोहित शर्माने त्याला चिडवले होते की, तो वर्ल्डकपसाठी तयारी करतोय. रोहितची ही मस्करी कार्तिकने मनावर घेतलेली दिसत आहे.