MI vs SRH : तिलक वर्माची झुंज अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय | पुढारी

MI vs SRH : तिलक वर्माची झुंज अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या क्लासेन (80), अभिषेक शर्मा (63), हेड (62), आणि मार्करम (42) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 277 धावंसख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या तिलक वर्माने दिलेली झुंज अपयशी ठरली. गोलंदाजीमध्ये हैदराबादच्या अचुक गोलंदाजीमुळे मुंबईला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 246 धावा करता आल्या. यासह हैदराबदने मुंबईला 31 धावांनी पराभूत करून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. (MI vs SRH)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

IPL 2024 च्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे यात अनेक विक्रम झाले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली. संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईला 20 षटकांत 5 गडी गमावून 246 धावा करता आल्या. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले, तर सलग दोन सामने गमावल्यानंतर मुंबईने नवव्या क्रमांकावर घसरण झाली.

रोहित-ईशानची वेगवान सुरूवात

हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाली. ही भागिदारी जी शाहबाज अहमदने फोडली. त्याने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनला बाद केले. त्याने आपल्या खेळीत 13 चेंडूत 34 धावा केल्या. त्याचवेळी रोहित शर्माही पाचव्या षटकात 26 धावा काढून माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीरने चांगली फलंदाजी करत टिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची मोठी भागीदारी केली. जयदेव उंडकटने ही भागीदारी 11व्या षटकात मोडली.

कर्णधार हार्दिकची पुन्हा फ्लॉप कामगिरी

टिलक वर्माने आपल्या खेळीत 64 धावा केल्या. यामध्ये त्याने दोन चौकार आणि सहा षटकार मारले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने 20 चेंडूत केवळ 24 धावा केल्या. सामन्यात टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड अनुक्रमे ४२ आणि १५ धावा करून नाबाद राहिले. हैदराबादकडून कर्णधार कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी शाहबाज अहमदला यश मिळाले.

हैदराबादची ऐतिहासिक कामगिरी

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. या बाबतीत हैदराबादने आरसीबीचा 11 वर्ष जुना विक्रम मोडला. हैदराबादने मुंबईविरुद्ध 20 षटकांत तीन गडी गमावून 277 धावा केल्या आणि मुंबईसमोर विजयासाठी 278 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडने दमदार सुरूवात केली. त्याने मयंक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. अग्रवाल 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या विकेटसाठी हेडसोबत 68 धावांची भागीदारी केली. हेडने 24 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. यावे त्याने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी अभिषेक शर्माने आपल्या खेळीत तीन चौकार आणि सात षटकार ठोकत 63 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. हेनरिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांच्यात 116 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला 277 धावांपर्यंत नेले. मार्करामने 28 चेंडूंचा सामना करत 42 धावा केल्या तर हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत 235.29 च्या स्ट्राइक रेटने 80 धावा केल्या. या दमदार खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि सात षटकार आले. मुंबईकडून हार्दिक पांड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा :

Back to top button