Ind vs Eng : कोण करणार शेवट गोड? भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी आजपासून | पुढारी

Ind vs Eng : कोण करणार शेवट गोड? भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी आजपासून

धर्मशाळा : वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे.

पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग ३ सामने जिंकले आणि आता त्यांना ११२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पण, इंग्लंडला किमान पाचवी कसोटी जिंकून इभ्रत वाचवण्याची संधी आहे.

भारतातील इतर मैदानांच्या तुलनेत धर्मशाळाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मानली जात असल्याने येथील खेळपट्टी वेगवान आणि उसळती आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे; परंतु कुलदीप यादवला खेळवण्याबाबत टीम इंडिया संभ्रमात असल्याचे दिसत आहे. तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे की फिरकी गोलंदाज खेळवायचे या पेचात रोहित शर्मा आहे.

गुरुवारी नाणेफेकीच्या वेळी भारतीय संघ आपला प्लेईंग इलेव्हन घोषित करेल. रजत पाटीदारच्या जागी देवदत्त पडिक्कल याला संधी मिळू शकते. धर्मशाळाच्या मैदानात ३ आठवड्यांपूर्वी रणजी सामना खेळवला गेला. हा रणजी सामना दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात खेळला गेला होता. चार दिवसांत ३६ विकेटस् पडल्या, तर या सर्व ३६ विकेटस् वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. या मैदानात रणजीचे ४ सामने खेळवले. यामध्ये वेगवान गोलंदाजांनी एकूण ८१४ षटके टाकली आहेत आणि २३.१७ च्या सरासरीने १२२ बळी घेतले आहेत. फिरकीपटूंनी १२२.२ षटके टाकली आणि ५८.४२ च्या सरासरीने फक्त सात बळी घेतले.

वेगवान गोलंदाजांना या सामन्यात झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघात दाखल आहे. असे झाल्यास रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे संघाचे प्रमुख फिरकीपटू असतील. बुमराहच्या पुनरागमनानंतर मोहम्मद सिराज आणि आकाश दीपही संघात राहतील.

धर्मशाळाची खेळपट्टी कशी असेल?

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, धर्मशाळाची खेळपट्टी वेगवान आणि उसळणारी असेल, वातावरण ढगाळ असल्यास चेंडू स्विंगही होण्यास मदत होईल. वेगवान गोलंदाज मोठा प्रभाव पाडू शकतात; परंतु फिरकीपटू देखील बाऊन्सचा आनंद घेऊ शकतात. खेळपट्टीवर कमी गवत दिसत असले तरी आऊटफिल्ड हिरवेगार आहे. रिव्हर्स स्विंग झाल्यास, होण्यास थोडा वेळ लागू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button