पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Ranking : भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने ICC कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याने दोन स्थानांची प्रगती करत 10वे स्थान गाठले आहे. त्याचे रेटिंग 727 झाले आहे. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. त्याने गेल्या चार सामन्यांमध्ये 655 धावा चोपल्या आहेत, ज्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. गुरुवारपासून (दि. 7) धर्मशाला येथे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू होणार आहे. भारताने यापूर्वीच 3-1 अशा अभेद्य आघाडीने ही मालिका खिशात घातली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनाही कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. रोहित 720 रेटिंगसह 13व्या स्थानावरून 11व्या स्थानावर तर कोहली (727) एका स्थानाने पुढे जात आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहली वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड मालिकेचा भाग नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने (661) क्रमवारीत 22 स्थानांची झेप घेतली असून तो 23 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ग्रीनने शानदार फलंदाजी केली होती. त्याने कठीण परिस्थितीत 174 धावांची नाबाद खेळी खेळली. इंग्लंडचा जो रूट (799) तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (ICC Test Ranking)
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ (771) तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे रेटिंग 2014 नंतर प्रथमच 800 अंकांच्या खाली घसरले आहे. पहिल्या कसोटीत खराब कामगिरी करूनही न्यूझीलंडचा केन विल्यमसन (870) पहिल्या क्रमांकावर कायम आहे. वेलिंग्टनमध्ये त्याने शून्य आणि 9 धावा केल्या होत्या. विल्यमसनचे सहकारी ग्लेन फिलिप्स (52 वे स्थान) आणि रचिन रवींद्र (76वे स्थान) यांनी क्रमवारीत सुधारणा केली आहे.
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (रेटिंग 867) राजवट कायम आहे. फिरकीपटू आर अश्विन (846) दुसऱ्या तर कागिसो रबाडा (834) तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (822) आणि फिरकी गोलंदाज नॅथन लायन (797) यांना चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. हेझलवूड एक स्थानाने पुढे सरकत चौथ्या स्थानावर तर लियॉनने दोन स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थान गाठले आहे. वेलिंग्टनमध्ये हेझलवूडने चार आणि लियॉनने 10 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 172 धावांनी जिंकला होता. (ICC Test Ranking)