Ind vs Eng Test : भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली | पुढारी

Ind vs Eng Test : भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील रांची येथील चौथा सामन्‍यात भारताने आज ( दि. २६) दिमाखदार विजय मिळवला. तब्‍बल… गड्यांनी इंग्‍लंडला मात दिली. या विजयामुळे भारताने मालिका ३-1 अशी जिंकली आहे. रांची कसोटीत इंग्‍लंडच्‍या पहिल्‍या डावातील ज्‍यो रुट याचे शतक तर भारताच्‍या यशस्‍वी जैस्‍वाल याच्‍या ७३ धावांसह ध्रुव जुरेल याची ९० धावांची खेळी लक्षवेधी ठरली. तसेच टीम इंडियाचा फिरकीपटू अश्‍विन याने दुसर्‍या डावात घेतलेल्‍या ५ विकेट भारताच्‍या विजयासाठी निर्णायक ठरल्‍या. (Ind vs Eng Test)

संबंधित बातम्या : 

भारताकडून ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी केली. जुरेलने दोन धावा घेत सामना जिंकला. जुरेल ३९ धावांवर तर शुभमन ५२ धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली. उपाहारानंतर सलग दोन चेंडूंत भारताला दोन धक्के बसले. रवींद्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर सरफराज खानही झेलबाद झाला. त्यानंतर भारताचा डाव गडगडायला सुरुवात झाली होती. त्याचवेळी शुभमनच्या जोडीला ध्रुव जुरेल मैदानात उतरला. विजयासाठी ६० हून अधिक धावांची गरज असताना दोघांनी भारताचा डाव सावरला.

आज चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताला ८४ धावांवर पहिला धक्का बसला. यशस्वी जैस्वाल (३७) जेम्स अँडरसनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही (५५) कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टॉम हार्टलीने बेन फॉक्सच्या हाती झेलबाद केले. रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाही विशेष काही करू शकला नाही, चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्टलेने सलग दोन चेंडूंवर जडेजा आणि सर्फराज खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जुरेल आणि शुबमनने शानदार फलंदाजी करत भारताला विजयाकडे नेले.

इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला. पहिला डावात बॅकफूटवर असणारा टीम इंडियाने इंग्‍लंडच्‍या दुसर्‍या डावात कमबॅक केले. टीम इंडियाच्‍या फिरकीपटूंसमोर इंग्‍लंडच्‍या संघाने नांगी टाकली. इंग्‍लंडचा दुसरा डाव १४५ धावांमध्‍ये आटोपला. भारताला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्‍य हाेते. (Ind vs Eng Test)

रुटच्‍या शतकाने इंग्‍लंड पहिल्‍या डावाला दिला आकार

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला. आकाश दीपच्या तीन विकेट्सने इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला धक्‍का दिला. त्याने बेन डकेट (11), ऑली पोप (0) आणि जॅक क्रोली (42) यांना तंबूत धाडले. आकाशने भेदक मारा केल्‍यानंतर टीम इंडियाचा फिरकीपटू अश्विनने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये तर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. बेअरस्टो 38 तर स्टोक्सला तीन धावा करता आल्या. सिराजने रूट आणि फॉक्सची 113 धावांची भागीदारी तोडली. फॉक्सचे अर्धशतक हुकले. तो 47 धावा करून सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. टॉम हार्टले 13 धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. रवींद्र जडेजाने शेवटच्या तीन विकेट घेतल्या. त्याच षटकात त्याने ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची १०२ धावांची भागीदारी मोडली.

पहिल्‍या डावात भारत बॅकफूटवर

पहिल्‍या डावात कर्णधार रोहित शर्माने निराशा केली. त्‍याला अँडरसनने दोन धावांवर बाद केले. यानंतर शुभमन गिलने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. मात्र रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ 17 धावा करू शकला. रवींद्र जडेजा 12 धावा करून बाद झाला. शुभमन, रजत आणि जडेजा यांना इंग्‍लंडचा फिरकीपटू शोएब बशीर याने तंबूत धाडले. दरम्यान, यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मात्र, 73 धावा करून तो बशीरचा बळी ठरला. सरफराज 14 धावा करून आऊट झाला तर अश्विन 1 धावा करून बाद झाला. या दोघांना हार्टलेने बाद केले.

ध्रुव जुरेलच्‍या खेळीने टीम इंडियाला तारले

रविवारी तिसर्‍या दिवशी भारताने सात विकेट्सवर 219 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. कुलदीप यावद आणि ध्रुव जुरेल यांच्‍या 88 धावांची निर्णायक भागीदारी करत भारताचा डाव सावरला. रविवारी भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला. कुलदीप २८ धावा करून बाद झाला. त्याने जुरेलसोबत ७६ धावांची भागीदारी केली. यानंतर आकाश दीप फलंदाजीला आला आणि त्याने जुरेलसोबत 40 धावांची भागीदारी केली. नऊ धावा करून आकाश बाद झाला. शोएब बशीरने या दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच बळी मिळवण्याची किमया साधली. जुरेलने सर्वाधिक ९१ धावा केल्या. त्‍याचे शतक हुकले. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. इंग्लंडकडून बशीरने पाच आणि हार्टलेने तीन बळी घेतले. तर जेम्स अँडरसनला दोन विकेट मिळाल्या. इंग्‍लंडला पहिल्‍या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली.

दुसर्‍या डावात इंग्‍लंडची फलंदाजी ढेपाळली

अश्विन आणि कुलदीप यांच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव १४५ धावांत आटोपला. जॅक क्रॉलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्याचवेळी ओली पोप, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांना खातेही उघडता आले नाही. बेन डकेट १५ धावा करून बाद झाला, जो रूट ११ धावा, जॉनी बेअरस्टो ३० धावा, कर्णधार बेन स्टोक्स ४ धावा करून बाद झाला, बेन फॉक्स १७ धावा करून बाद झाला, टॉम हार्टली ७ धावा करून बाद झाला. अश्विनने कसोटीत ३५व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

हेही वाचा : 

Back to top button