WPL 2024 : संजनाने दिली मुंबईला ‘संजीवनी’ | पुढारी

WPL 2024 : संजनाने दिली मुंबईला ‘संजीवनी’

बंगळूर; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील महिला प्रीमियर लीगचा पहिलाच सामना चित्तथरारक आणि रोमहर्षक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणार्‍या या सामन्यात संजीवन संजनाने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबईसाठी विजयश्री खेचून आणली. विजयासाठी पाच धावा हव्या असताना पाचव्या चेंडूवर कर्णधार हरमनप्रीत (55) बाद झाल्यावर मुंबईच्या आशा मावळल्या होत्या, पण संजीवन संजना या नवख्या खेळाडूने कॅप्सीच्या चेंडूवर तडाखेबाज षटकार ठोकून मुंबईला दिमाखात विजय मिळवून दिला. दिल्लीने प्रथम गोलंदाजी करताना 171 धावा केल्या, मुंबईने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. (WPL 2024)

यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या दिल्लीने 20 षटकांत 5 बाद 171 धावा केल्या होत्या. सलामीवीर शेफाली वर्मा 1 धाव करून बाद झाली. कर्णधार मेग लेनिंग एलिस कॅप्सी यांनी दुसर्‍या विकेटसाठी दमदार भागीदारी रचली. कॅप्सीने 75 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेडूंत 42 धावा करताना 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

हे आव्हान पेलताना हिली मॅथ्यूज शुन्यावर बाद झाली, पण यास्तिका भाटिया (57) आणि हरमनप्रीत कौर (55) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई विजयापर्यंत पोहोचली, पण ऐनवेळी हरमन बाद झाली आणि संजनाने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकांत 5 बाद 171 धावा. (इलिस कॅप्सी 75, जेमिमाह रॉड्रिग्ज 42. अ‍ॅमेलिया केर 2/43.)
मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 6 बाद 173 धावा. (यास्तिका भाटिया 57, हरमनप्रीत कौर 55, अरुंधती रेड्डी 2/27.)

बॉलीवूड स्टार्सनी चमकवला उद्घाटन सोहळा

बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये महिला प्रीमियर लीगची सुरुवात झाली. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना जिंकून मुंबईने आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. त्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाहरूख खानने महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात स्टेजवर ग्रँड एन्ट्री घेतली. याचबरोबर शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन आणि वरुण धवन यांनीही आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरूख सोबतच आर्यन खान, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर आणि वरुण धवनने देखील आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

हेही वाचा :

Back to top button