कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : झुंजार क्लबची अटीतटीची झुंज व्यर्थ ठरवत पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने त्यांचा 3-0 असा पराभव केला. तत्पूर्वीच्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने उत्तरेश्वर तालीम मंडळावर 3-1 अशी मात केली. खंडोबा तालीम मंडळ आयोजित के.एम. चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. (KM Championship)
शुक्रवारी भागीरथी संस्थेच्या वतीने सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते बॉल बाईजना किटचे वाटप आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील लोकांचा गौरव करण्यात आला. (KM Championship)
शुक्रवारच्या सामन्यात पाटाकडील अ संघाने झुंझार क्लबवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळविला. सामन्याच्या 7 व्या मिनिटाला पाटाकडीलच्या ओंकार पाटील याने गोल केला. 24 व्या मिनिटाला ऋषीकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात चढाईत गोलपोस्टला लागून परतलेल्या चेंडूला ऋषीकेश मेथे-पाटील याने पुन्हा माघारी गोलपोस्टमध्ये धाडत वैयक्तिक दुसरा व संघाकरिता तिसरा गोल केला. त्यांच्या नबी खान, तुषार बिस्वा, साईराज पाटील, ओंकार मोरे यांनी उत्कृष्ट खेळ केला. झुंजारकडून समर्थ नवाळे, शाहू भोईटे, प्रथमेश साळोखे, अक्षय शिंदे, विकी रजपूत यांनी गोलची पतरफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले.
दुपारच्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने उत्तरेश्वर तालीम मंडळाचा 3-1 असा पराभव केला. मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात 45 व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या स्वराज पाटीलने गोलची नोंद केली. ही आघाडी फार काळ टिकली नाही. संध्यामठच्या हर्ष जरगने 64 व्या मिनिटाला गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. यानंतर सामन्याच्या जादा वेळेत संध्यामठकडून 80+4 मिनिटाला यश जांभळे याने, तर 80+7 व्या मिनिटाला सिद्धेश साठे याने लागोपाठ दोन गोल नोंदवत संघाला 3-1 असा विजय मिळवून दिला.
सामनावीर : हर्ष जरग (संध्यामठ) / ऋषीकेश मेथे-पाटील (पाटाकडील)
लढवय्या : स्वराज पाटील (उत्तरेश्वर) / अक्षय शिंदे (झुंजार क्लब)
आजचे सामने
शिवाजी तरुण मंडळ वि. पाटाकडील तालीम ब, दुपारी 2 वाजता.
खंडोबा तालीम वि. वर्षा विश्वास तरुण मंडळ, दुपारी 4 वाजता.
हेही वाचा :