रांची कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि अपेक्षेप्रमाणे फलंदाजी घेतली भारताच्या संघात बुमराह नसताना त्यातल्या त्यात अनुभवी मुकेश कुमारचा समावेश होईल असे वाटले होते, पण धक्कातंत्राचा अनुभव देत रोहित शर्माने मुकेश कुमारच्या ऐवजी आकाशदीपला संधी दिली. संधीचा फायदा उठवत आकाशदीपने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. बर्याच जलदगती गोलंदाजांची आपल्या पहिल्याच कसोटीत खेळताना दडपण अथवा अतिउत्साहाच्या नादात चेंडूवरचे नियंत्रण सुटू देण्याची शक्यता असते, पण आकाशदीपने शुक्रवारी पहिल्या तासात अचूक टप्पा गाठत गोलंदाजी केली. एकापाठोपाठ एक तीन धक्के देत त्याने इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येच्या इच्छा-आकांक्षांना तडा दिला. 3 बाद 57 असताना इंग्लंडला तारून न्यायला एकच आशा इंग्लंडपाशी शिल्लक होती ती जो रूटची. या मालिकेत जो रूटला सूर गवसला नव्हता. कधी उत्तम चेंडूवर तर कधी चुकीच्या फटक्यांच्या निवडीने तो बाद झाला होता तेव्हा जो रूटसारख्या कसलेल्या फलंदाजाचे हात आपल्या चुका दुरुस्त करायला आसुसले नसते तरच नवल होते. (IND vs ENG 4th Test)
इंग्लंडच्या बॅझबॉलपद्धतीने खेळायचे का पारंपरिक पद्धतीने खेळायचे हा जो रूट पुढे मोठा प्रश्न होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी 3 गडी बाद होईपर्यंत 5 च्या सरासरीने धावा काढल्या होत्या. मोहम्मद सिराजला लक्ष्य करून त्यांनी फटकावले. आकाशदीपसारख्या पदार्पण करणार्या नवशिक्यावर सिराजवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम होईल आणि परिणामी नव्या चेंडूवर भारताची जलदगती गोलंदाजी निष्प्रभ होईल हा इंग्लंडचा डाव होता. सिराजच्या चौथ्या षटकात झॅक क्राऊलीने तब्बल 19 धावा ठोकत त्यांच्या डावपेचांची दिशा दाखवली, पण आकाशदीपने एका षटकात डकेट आणि पोपचे बळी मिळवत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. क्राऊलीचा त्याने नोबॉलवर त्रिफळा उडवला आणि पुन्हा त्याचा बचाव भेदत दोन षटकांनंतर त्रिफळा उडवला. दुसरीकडे जो रूट जोडीदाराच्या प्रतीक्षेत होता. जॉनी बेअरस्टो यालाही रूट प्रमाणेच या मालिकेत अपयशाचा सामना करावा लागला आहे, तेव्हा त्याच्यावरही उत्तम कामगिरीचे दडपण होते. भारतासाठी हीच आक्रमणाची वेळ होती, पण बेअरस्टोने रूटला साथ देत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. उपहारापर्यंत पुन्हा भारताने बेअरस्टो आणि बेन स्टोक्सचे बळी मिळवत आपला वरचष्मा सिद्ध केला. (IND vs ENG 4th Test)
जो रूटच्या अनुभवाचा फायदा इंग्लंडच्या कामाला आला. बॅझबॉल गुंडाळून ठेवत त्याने फक्त भागीदारींवर लक्ष दिले. बेअरस्टो नंतर प्रथम यष्टिरक्षक फोक्सच्या साथीने त्याने113 धावा जोडत इंग्लंडला प्रथम संकटातून बाहेर काढले आणि दिवसअखेर ऑली रॉबिन्सनच्या साथीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करून इंग्लंडला या कसोटीत परतण्याची आशा दाखवली आहे. भारताची उपहारानंतरची सामन्यावर पकड ढिली झाली. दुसर्या बाजूने फलंदाज बाद करायचे आपले मनसुबे यशस्वी झाले नाहीत आणि 221 चेंडू खेळून जो रूट त्याच्या फलंदाजीच्या घराण्यानुसार खेळत शतक ठोकून खेळपट्टीवर उभा राहिला. 6 बाद 227 नंतर इंग्लंडला आपण 275 धावांत गुंडाळणे अपेक्षित होते, पण भारतीय गोलंदाजांना यात अपयश आले. हैदराबादला इंग्लंडच्या शेपटाने ऑली पोपच्या साथीने 145 धावा जोडल्या होत्या. इथे जो रूटच्या साथीने इंग्लंडच्या शेपटातील आतापर्यंत फक्त हार्टलीचा बळी देत 77 धावा जोडल्या आहेत. यापुढे इंग्लंडची प्रत्येक धाव ही आपल्यासाठी डोईजड ठरू शकते.
भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 60 षटकांत 165 धावा देत दोन बळी मिळवले. सिराजच्या दुसर्या स्पेलमध्ये त्याला दोन बळी मिळाले, पण सकाळी दुसर्या बाजूने इंग्लंडवर दडपण आणण्यात तो अपयशी ठरला. भारताच्या गोलंदाजांनी एकेका स्पेलमध्ये यश मिळवले, पण जलदगती गोलंदाज जोडीने शिकार करण्यात किंवा फिरकी त्रिकुटाच्या मार्याचे एकत्रित दडपण आणायला आपल्याला जमले नाही. आजचे पहिले सत्र इंग्लंडचा डाव गुंडाळून भारताने बिनबाद धावसंख्येवर उपहाराची वेळ गाठणे गरजेचे आहे. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे असले तरी आपल्याला इथे चौथ्या डावात फलंदाजी करायची आहे. भारताने पहिल्या डावात कमीत कमी दीडशे धावांची आघाडी घेणे गरजेचे आहे आणि यासाठी आज इंग्लंडला लवकरात लवकर गुंडाळणे नितांत गरजेचे आहे.
हेही वाचा :