

रांची; वृत्तसंस्था : रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात आपला संघर्ष सुरूच ठेवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने 7 बाद 302 धावा केल्या आहेत. रूट (नाबाद 106) आणि ऑली रॉबिन्सन (नाबाद 31) क्रीजवर आहेत. दोघांमध्ये 57 धावांची भागीदारी झाली आहे. (IND vs ENG 4th Test)
रांची कसोटीचे पहिले सत्र भारताच्या नावावर राहिले. पदार्पणाचा सामना खेळणार्या वेगवान गोलंदाज आकाशदीपने इंग्लंडची आघाडीची फळी उखडून टाकली. त्याने बेन डकेट (11), ऑली पोप (0) आणि जॅक क्रोली (42) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर फिरकीपटू अश्विनने आपली जादू दाखवली आणि जॉनी बेअरस्टोला (38) तंबूचा रस्ता दाखवला, तर रवींद्र जडेजानेही बेन स्टोक्सला (3) माघारी धाडले. (IND vs ENG 4th Test)
उपहारापर्यंत पहिल्या सत्रात इंग्लंडने पाच विकेटस् गमावून 112 धावा केल्या होत्या. यानंतर दुसर्या सत्रात चहापानाच्या वेळेपर्यंत रूट आणि बेन फॉक्स यांनी एकही विकेट पडू दिली नाही. त्या सत्रात दोघांनी मिळून 86 धावा जोडल्या. तिसर्या सत्रात सिराजने टीम इंडियाचे कमबॅक केले. त्याने रूट आणि फॉक्सची 113 धावांची भागीदारी मोडली. फॉक्सचे अर्धशतक हुकले. तो 47 धावा करून सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचवेळी टॉम हार्टले 13 धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर रूटने ऑली रॉबिन्सनसह इंग्लंडचा डाव पुन्हा सांभाळला आणि कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे. तिसर्या सत्रात इंग्लंडने 29 षटकांत दोन गडी गमावून 104 धावा केल्या. भारताकडून आकाशने सर्वाधिक तीन विकेटस् घेतल्या आहेत. त्याचवेळी सिराजला दोन विकेटस् मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. (IND vs ENG 4th Test)
इंग्लिश फलंदाज जो रूटने रांची कसोटीच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक झळकावून इतिहास रचला. यजमान भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये जो रूटला धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र चौथ्या कसोटीत त्याने बॅझबॉल स्टाईलला तिलांजली देत आपला नैसर्गिक खेळ केला. या सावध खेळीतून त्याने भारताविरुद्ध शतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक ठरले आहे. अशाप्रकारे रूटने विराट कोहलीला 'फॅब-4' मध्ये खूप मागे टाकले आहे. आधुनिक क्रिकेटमधील विलक्षण कामगिरी करणार्या केन विल्यम्सन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली आणि जो रूट या 4 फलंदाजांच्या समूहाला फॅब-4 या टोपण नावाने ओळखले जाते. केन विल्यम्सनच्या नावावर 'फॅब-4' मध्ये सर्वाधिक शतके आहेत. स्टीव्ह स्मिथ दुसर्या तर जो रूट तिसर्या स्थानावर आहे, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा :