Kolhapur Accident : ट्रॉलीचा हूक तुटून दुचाकीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू | पुढारी

Kolhapur Accident : ट्रॉलीचा हूक तुटून दुचाकीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर-ट्रॉलीचा हूक तुटल्याने ट्रॉली मोटारसायकलवर आदळून झालेल्या अपघातात आनंदा सोपान गणपते (वय 55) व विकास आनंदा गणपते (30, रा. घोडकेनगर) या पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री 10.45 च्या सुमारास डेक्कन चौक परिसरात घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

आनंदा व विकास गणपते हे दोघे मोटारसायकलवरून (एम एच 09 ई वाय 7594) गुरुवारी रात्री स्टेशन रोडवरून कोरोची येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते. डेक्कन चौक परिसरात ते आले असता साखर कारखान्याकडून इचलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर-ट्रॉली (के ए 23 टी डी 6329) येत होती. त्यावेळी अचानकपणे ट्रॉलीला जोडणारा हूक निघाला आणि पाठीमागील ट्रॉली रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने निघालेल्या गणपते पिता-पुत्रांच्या मोटारसायकलवर आदळली. त्यामध्ये दोघेही गाडीसह रस्त्यावर कोसळले. त्यामध्ये विकास याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

तर आनंदा गणपते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सीपीआरला हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आनंदा गणपते यंत्रमाग कामगार होते तर विकास गणपते यांचा वाहनांच्या स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय होता. या अपघाताची वर्दी आशिष दिगंबर डोंगरे (23) यांनी दिली आहे. विकास याच्या मागे आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

एकाच रस्त्यावर एकाच दिवसात तिघांचा मृत्यू

शहरातील डेक्कन ते कोरोची रोड वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. नित्याच्या वाहतूक कोंडीबरोबरच या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. साखर कारखान्याजवळ अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासांत या रस्त्यावर पिता-पुत्राचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी तातडीने उपाययोजनांची गरज आहे.

Back to top button