

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सतराव्या हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा वादात सापडला आहे. सूरतची मॉडेल तानिया सिंगने जीवन संपवल्याप्रकरणी अभिषेक शर्माला स्थानिक पोलिसांनी समन्स बजावले आहे. तानिया फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती आणि सोशल मीडियावर तिचे खूप फॉलोअर आहेत. (Tanya Singh)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 वर्षीय तानिया मूळची राजस्थानची आहे. ती फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत होती. तिने अपार्टमेंटच्या छताला गळफास घेऊन जीवन संपवले. तानियाच्या जीवन संपवण्यामागे प्रेमसंबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस तानियाच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासत आहेत. यादरम्यान अभिषेक शर्माचे नाव पुढे आले आहे. (Tanya Singh)
तानियाच्या शेवटच्या डायल लिस्टमध्ये अभिषेकचे नाव होते. तानिया आणि अभिषेक यांच्यात बराच काळ प्रत्यक्ष संपर्क नव्हता, असे प्राथमिक माहितीवरून कळते. मात्र, दोघेही बरेच दिवस मित्र होते. त्यामुळे पोलिसांनी अभिषेकला सामान्य चौकशीसाठी बोलावले आहे.
अभिषेक हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 47 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 137.38 च्या स्ट्राइक रेटने 893 धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 75 आहे. याशिवाय त्याने या स्पर्धेत नऊ विकेट्सही घेतल्या आहेत. अभिषेक अलीकडेच रणजी ट्रॉफी सामन्यात पंजाबकडून तामिळनाडूविरुद्ध खेळताना एका षटकात पाच षटकार मारून प्रसिद्धीझोतात आला होता. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.
हेही वाचा :