जरांगे पाटलांनी आता हट्ट सोडावा : राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

जरांगे पाटलांनी आता हट्ट सोडावा : राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : ओबीसीसह कुठल्याच आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला राज्य शासनाने 10 टक्के आरक्षण दिले. मराठा समाज बांधवांनी याचे स्वागत केले, परंतु ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, हा मनोज जरांगे पा. यांचा हट्ट योग्य नाही. तो त्यांनी सोडवा, असे रोखठोक मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तालुक्यातील विविध विकास कामांच्या शुभारंभानिमित्त विखे पा. संगमनेरला आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाज योद्धा जरांगे पा. व समाज मागणीचा विचार करून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत टीकेल, असे शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले. सरकारने आपली भूमिका चोख पार पाडली. याबाबत काय भूमिका घ्यायची, हा जरांगे पा. यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, असे विखे पा. म्हणाले.

मी म्हणेल तसचं झालं पाहिजे, नाहीतर एकाही नेत्याला गावात फिरकू देणार नाही, 24 तारखेपासून रास्ता रोको सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे पा. यांनी दिला, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, सरकारने दिलेल्या आरक्षणाचे मराठा समाज बांधवांनी स्वागत केले, परंतु जरांगे पा. यांनी काय करावं व काय करू नये, हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यांना ओबीसी आरक्षण हवे आहे, मात्र हे सरकारला शक्य नाही. त्यांनी हा हट्ट सोडावा. जरांगे पा. यांनी निःस्वार्थीपणे आरक्षणाची चळवळ सुरू केली होती. ती संपण्यास तेच कारणीभूत ठरतील. त्यांना आता मराठा समाजाचा पाठिंबा मिळणार नसल्याचे विखे यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा

Back to top button