Rohit Sharma Insta Story : ‘ही आजकालची पोरं…’, राजकोट कसोटी विजयानंतर रोहित शर्माची इन्स्टा स्टोरी व्हायरल | पुढारी

Rohit Sharma Insta Story : ‘ही आजकालची पोरं...’, राजकोट कसोटी विजयानंतर रोहित शर्माची इन्स्टा स्टोरी व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Insta Story : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित सेनेने चमकदार कामगिरी करत इंग्लिश संघाचा 434 धावांनी दारुण पराभव केला. भारताच्या या विजयात संघाच्या युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. आता या विजयानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा युवा खेळाडूंचा चाहता झाला आहे. त्याने एक खास फोटो शेअर करून या यंग स्टार्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर हिटमॅनची इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरी व्हायरल झाली आहे. यात रोहितने यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने ‘ही आजकालचं पोरं’ असे कॅप्शन लिहिले असून ज्याच्या पुढे टाळ्या वाजवतानाचा इमोजी टाकला आहे. पोस्टमध्ये ध्रुव जुरेल डकेटला धावबाद करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल धावताना दिसत आहेत. (Rohit Sharma Insta Story)

सरफराज आणि ध्रुव जुरेल यांनी राजकोट कसोटीतून भारतासाठी पदार्पण केले. दोन्ही खेळाडूंनी पदार्पणातच लक्षवेधी कामगिरी केली. सरफराजने या सामन्याच्या दोन्ही डावात धमाकेदार अर्धशतके झळकावली आणि कसोटी पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय ठरला. त्याने पहिल्या डावात 62 तर दुसऱ्या डावात 68 धावा केल्या. त्याचवेळी जुरेलने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. भारताच्या पहिल्या डावात त्याने 46 धावांचे मोलाचे योगदान दिले. त्यानंतर विकेट्सच्या मागे जबाबदारीने यष्टीरक्षण करताना कमालीची चपळता दाखवली आणि बेन डकेटला धावबाद केले. (Rohit Sharma Insta Story)

या दोघांशिवाय भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल यानेही इंग्लिश संघाच्या बॅझबॉल रणनीतीला जशास तए प्रत्युत्तर देत आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. त्याने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद 214 धावांची वादळी खेळी साकारली. त्याचे हे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठरले. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाने इंग्लंड समोर विजयासाठी डोंगराएवढे लक्ष्य दिले. ज्याच्यापुढे बेन स्टोक्सच्या संघाने लोटांगण घातले. यासह भारताने मालिकेतील दुस-या विजयाचीही नोंद केली.

Back to top button