Ben Stokes : लाजिरवाण्या पराभवानंतरही स्टोक्स म्हणतो, ‘कसोटी मालिका आम्हीच जिंकू’ | पुढारी

Ben Stokes : लाजिरवाण्या पराभवानंतरही स्टोक्स म्हणतो, ‘कसोटी मालिका आम्हीच जिंकू’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ben Stokes : राजकोट कसोटीत 434 धावांनी झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारतीय संघाला पुन्हा आव्हान दिले आहे. ‘तिस-या कसोटीतील पराभवाच्या धक्क्यातून आमचा संघ लवकरच सावरेल आणि आम्ही ही मालिका 3-2 ने जिंकण्याच्या इराद्याने रांचीच्या मैदानात उतरणार आहोत,’ असे त्याने सांगितले आहे.

राजकोट कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत भारताला टक्कर दिल्यानंतर इंग्लिश संघ तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पूर्णपणे मागे पडला. इंग्लंडच्या शेवटच्या 18 विकेट केवळ 217 धावांत पडल्या.

धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला आहे. ज्यामुळे इंग्लंडच्या अत्यंत सकारात्मक दृष्टीकोनवर तज्ज्ञांनी जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र, स्टोक्सने या टीकाकारांकडे कानाडोळा करत, ‘अशा टीकेचा माझ्या संघाला काही फरक पडत नाही. इंग्लंडचा संघ भविष्यात अधिक सकारात्मकतेने क्रिकेट खेळेल’, असे प्रत्युत्तर दिले आहे.

स्टोक्स (Ben Stokes) म्हणाला, ‘एखाद्या गोष्टीबद्दल प्रत्येकाचे त्याचे-त्याचे मत असते. पण आमच्यासाठी ड्रेसिंग रूममधील खेळाडूंचे मत महत्त्वाचे असते. आम्हाला माहित आहे की निकाल नेहमीच तुमच्या बाजूने जात नाही, पण तरीही इंग्लंड संघाकडे मालिका विजयाची संधी आहे. रांचीच्या मैदानात उतरण्यापूर्वी आम्ही राजकोटमधील पराभवाची निराशा मागे ठेवू आणि मालिका 3-2 ने जिंकू’, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

स्टोक्सने (Ben Stokes) इंग्लंडचा पहिल्या डावातील शतकवीर बेन डकेट आणि भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांचे कौतुक केले. गोलंदाजी करण्याच्या स्वतःच्या संधींबद्दल त्याने यावेळी खुलासा केला. तो म्हणाला, ‘मला खूप बरे वाटत आहे. पण माझ्या संपूर्ण शरीराला गोलंदाजीची सवय लावण्याची गरज आहे. त्यामुळे मला हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचे नाही.’

Back to top button