दुबई; पुढारी ऑनलाईन : T20 ranking : T20 विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय सलामीवीर केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांना ताज्या आयसीसी टी 20 (ICC T20)च्या क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे. राहुल सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, तर हिटमॅन रोहितने दोन स्थानांनी झेप घेत 15 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र, भारताचा माजी टी-20 कर्णधार विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 (T20I) मालिकेत विश्रांती घेतलेला विराट कोहली टॉप-10 क्रमवारीतून बाहेर पडला आहे. यापूर्वी कोहली आठव्या स्थानावर होता आणि त्याची सध्या 11 व्या स्थानावर घसरण झाली आहे. टी 20 विश्वचषकात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, तर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी टी 20 विश्वचषक (T20 WC) स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत राहुलने अफगाणिस्तानविरुद्ध 69, स्कॉटलंडविरुद्ध 50 आणि नामिबियाविरुद्ध नाबाद 50 धावा केल्या. तर रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तडाखेबाज फलंदाजी केली. त्याने अर्धशतक झळकावत 65 धावा केल्या. हिटमॅनबद्दल बोलायचे झाले तर तो किवी संघाविरुद्धचा प्लेयर ऑफ द सिरीज ठरला. त्याने तीन सामन्यांमध्ये ५३ च्या सरासरीने १५९ धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने टी 20 च्या क्रमवारीत टॉप-10 उडी घेतली आहे. भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने दोन अर्धशतके झळकावली. गुप्टिल क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानही एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी, पाक कर्णधार बाबर आझम अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम तिसऱ्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत मिचेल सँटनरने 13, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 19, तर आर अश्विनने 92 व्या स्थानी पोहचले आहेत. अक्षर पटेल 112 व्या स्थानावर आहे.
दरम्यान, उद्यापासून (दि. 25) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी आज (दि. 24) झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठा खुलासा केला. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट केले. रहाणे म्हणाला, श्रेयस कानपूर टेस्टमधून पदार्पण करणार आहे. दुर्दैवाने, केएल राहुल दुखापतग्रस्त असल्याने पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी तो संघाचा भाग असणार नाही. त्यामुळे श्रेयस पदार्पण करणार आहे. मात्र, रहाणेने अद्याप पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. अजिंक्य रहाणेने राहुलच्या जागी अय्यरच्या पदार्पणाची चर्चा केली असली तरी अय्यर विराट कोहलीच्या जागी खेळताना दिसणार यात शंका नाही.