IND vs AFG 3rd T20 : टीम इंडियाचा ‘क्लीन स्विप’चा इरादा; अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना

IND vs AFG 3rd T20 : टीम इंडियाचा ‘क्लीन स्विप’चा इरादा; अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-20 सामना
Published on
Updated on

बंगळूर; वृत्तसंस्था : भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवत मालिका आपल्या नावे केली आहे. हाच फॉर्म कायम राखत टीम इंडिया 'क्लीन स्विप' करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतेल, अशीही आशा आहे. जूनमध्ये होणार्‍या विश्वचषकापूर्वी भारताचा हा शेवटचा टी-20 सामना आहे. मोहाली आणि इंदूरमधील विजयानंतर संघ व्यवस्थापनाला कोणतीही चूक करायची नाही. पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करण्याची भारताची रणनीती दोन्ही सामन्यांत सहा गडी राखून विजय मिळवण्यात महत्त्वाची ठरली. या सामन्यात संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि आवेश खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (IND vs AFG 3rd T20)

भारताने पहिल्या सामन्यात 17.3 षटकांत 159 धावांचे, तर दुसर्‍या सामन्यात 15.4 षटकांत 173 धावांचे लक्ष्य गाठले. याआधी टी-20 मध्ये भारतीय संघ सुरुवातीला सावध खेळ करत असून, शेवटच्या षटकांमध्ये धुवाँधार फलंदाजी करण्याचे धोरण अवलंबत होता; पण आता फलंदाज पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळी करत आहेत आणि हे शिवम दुबे आणि विराट कोहलीने दाखवून दिले आहे. तब्बल 14 महिन्यांनंतर पहिला टी-20 खेळणार्‍या कोहलीने इंदूरमध्ये 16 चेंडूंत 29 धावा केल्या. त्याने अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीबूर रहमानचा सामना केला आणि सात चेंडूंत 18 धावा केल्या. (IND vs AFG 3rd T20)

साधारणपणे कोहली फिरकीपटूंविरुद्ध संथ खेळतो; पण या सामन्यात उलट चित्र पाहायला मिळाले होते. गेल्या वर्षी डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दुबे तीन वर्षांनी भारतीय संघात परतला होता. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला; पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 संघात त्याला स्थान मिळाले नाही. परंतु, संधी मिळताच त्याने सोने केले. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खानशिवाय खेळत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध त्याने दोन आक्रमक अर्धशतके झळकावली. सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही अर्धशतक झळकावले.

रोहितची बॅट तळपण्याची आशा

कर्णधार रोहितची बॅट अजून तळपली नाही. पहिल्या सामन्यात तो शुभमन गिलसोबत झालेल्या गैरसमजामुळे धावबाद झाला, तर दुसर्‍या सामन्यात फजलहक फारुकीचा चेंडू त्याला समजला नाही आणि स्वस्तात विकेट गमावली. दोन सामन्यांत केवळ दोन धावा करू शकणार्‍या रोहितच्या फॉर्मची संघ व्यवस्थापनाला चिंता नसेल, मात्र शेवटच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच असेल.

या दोन युवा खेळाडूंवर भारताची नजर असेल

या सामन्यात फलंदाजीच्या क्रमात कदाचित बदल होऊ शकणार नाही; पण कुलदीप यादव आणि आवेश खानला संधी मिळू शकते. रवी बिष्णोई किंवा वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीपला मैदानात उतरवले जाऊ शकते आणि मुकेश कुमारच्या जागी आवेशला मैदानात उतरवले जाऊ शकते. यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा गेल्या वर्षी रायपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यापासून टी-20 खेळत आहे. त्याला विश्रांती देण्याचा विचार असेल, तर संजू सॅमसनला मैदानात उतरण्याची संधी आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news