कुष्ठरोगाचे 6 टक्के रुग्ण 18 वर्षांखालील; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

कुष्ठरोगाचे 6 टक्के रुग्ण 18 वर्षांखालील; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत एकूण 17 हजार नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये 6.80 टक्के म्हणजेच 1160 नवीन कुष्ठरोगी आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विशेष मोहीमही राबवली होती. लहान मुलांमध्ये आढळणारा कुष्ठरोग हे निर्मूलन मोहिमेसमोरील आव्हान असल्याचे
तज्ज्ञांनी म्हणणे आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या 16 दिवसांत 6600 रुग्ण आणि 3 लाख 48 हजार संशयित रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण चंद्रपूरमध्ये 487 इतकी असून, त्यापाठोपाठ पालघरमध्ये 442 रुग्णांची नोंद झाली आहे. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री जीवाणूमुळे होणारा एक जुनाट संसर्गजन्य रोग आहे. हा रोग त्वचेवर, नसा, श्वसनमार्गाच्या पृष्ठभागावर आणि डोळ्यांवर परिणाम करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार, भारतात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव दर 10,000 लोकसंख्येमागे 0.4 इतका आहे.

सहसंचालक (टीबी) डॉ. सुनीता गोल्हाईत म्हणाल्या, 'वर्षभर कुष्ठरोगाचे नियमित निरीक्षण सुरु असते. विशेष मोहीमेमुळे गुप्त आणि संशयित रुग्ण शोधण्यात मदत होते. पॅरामेडिकल कर्मचारी घरोघरी जाऊन रुग्णांची ओळख पटवतात. शरीरावर पांढरे चट्टे यांसारखी प्राथमिक लक्षणे, संशयित रुग्णांचे वैद्यकीय निदान आणि प्रयोगशाळेच्या चाचणीद्वारे डॉक्टरांकडून संसर्ग झाल्याचे निदान केले जाते. यानुसार औषधोपचार दिले जातात.'

राज्याच्या आरोग्य विभागाने आपल्या विशेष कुष्ठरोग शोध मोहिमेद्वारे 6679 नवीन रुग्ण आणि 3,48,172 संशयित रुग्ण आढळले आहेत. 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान 35 जिल्ह्यांमध्ये 8.35 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान नियमित देखरेखीदरम्यान सुमारे 6731 रुग्ण आढळले. राज्यात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत 13,410 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

कुष्ठरोग्यांची संख्या

वर्ष            रुग्णांची संख्या
2016-17 : 4134
2017-18 : 5073
2018-19 : 5268
2019-20 : 6116
2020-21 : 5903
2021-22 : 6231
2022-23 : 6731

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news