

पुढारी ऑनलाईन डेस्क : झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने (Sikandar Raza) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सलग 5 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्क्युलम आणि द. आफ्रिकेच्या रीझा हेंड्रिक्स यांच्या नावावर होता. या तिघांनी आपल्या टी-20 कारकिर्दीत सलग 4 अर्धशतके झळकावली आहेत.
रझाने (Sikandar Raza) नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक आफ्रिका क्षेत्र पात्रता फेरीत सलग 3 अर्धशतके झळकावली होती. यादरम्यान, त्याने नायजेरियाविरुद्ध 65, रवांडाविरुद्ध 58 आणि केनियाविरुद्ध 82 धावा फटकावल्या होत्या. यानंतर रझाने डिसेंबर 2023 मध्ये हरारे येथे आयर्लंडविरुद्ध 65 धावांची इनिंग खेळली होती. आता त्याने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत श्रीलंकेविरुद्ध 62 धावा केल्या.
विशेष म्हणजे, रझाने (Sikandar Raza) फलंदाजीसह गोलंदाजीतही अप्रतिम योगदान दिले आहे. त्याच्या शेवटच्या 5 टी-20 सामन्यांमधील गोलंदाजीचे आकडे (3/3, 2/13, 2/21, 3/28 आणि 3/13) लक्षवेधी आहेत.
रझाने 79 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 25.85 च्या सरासरीने आणि 134.80 च्या स्ट्राइक रेटने 1,836 धावा केल्या आहेत. यादरम्यान 87 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने 13 अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये तो झिम्बाब्वेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर गोलंदाजीतही त्याने 22.05 च्या सरासरीने आणि 6.97 च्या इकॉनॉमी रेटने 58 बळी घेतले आहेत.
श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगाने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने तुफानी खेळी खेळली. त्याच्यासह शॉन विल्यम्सने 14, क्रेग इर्विनने 10 तर टिनाशे कमुनुकाम्वेने 26 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे झिम्बाब्वेने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 143 धावा केल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि महेश तिक्षना यांनी 2-2 बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 83 धावांत 6 विकेट गमावल्या. यानंतर अँजेलो मॅथ्यूजने आणि दासुन शनाकाने जबाबदारीने खेळे केला आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले.
शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 14 धावांची गरज होती. मॅथ्यूज आणि शनाका फलंदाजी करत होते. झिम्बाब्वेसाठी शेवटचे षटक टाकणाऱ्या ब्लेसिंग मुझाराबानीच्या पहिल्या दोन चेंडूंवर मॅथ्यूजने दोन चौकार मारले. तिसरा चेंडू डॉट गेला. चौथ्या चेंडूवर मॅथ्यूज झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर नवा फलंदाज दुष्मंथा चमीराने चौकार मारला. त्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. चमीरासह शनाकाने 2 धावा काढल्या आणि 3 गडी राखून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मॅथ्यूजने 46 धावांची तुफानी खेळी केली. कुसल मेंडिस आणि कुसल परेराने प्रत्येकी 17 धावा केल्या. शनाका (26) आणि असलंका (16) नाबाद राहिले. झिम्बाब्वेकडून कर्णधार रझाने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर ब्लेसिंग मुजरबानीला 2 विकेट्स मिळाल्या.