INDvsENG Test Series : अश्विन-अँडरसन बनवणार मोठा विक्रम, भारत-इंग्लंड मालिकेत रचणार इतिहास | पुढारी

INDvsENG Test Series : अश्विन-अँडरसन बनवणार मोठा विक्रम, भारत-इंग्लंड मालिकेत रचणार इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG Test Series : टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामाच्या दृष्टीने भारत-इंग्लंड मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

अश्विन-अँडरसन महाविक्रम करू शकतात (INDvsENG Test Series)

आगामी कसोटी मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल. हे दोन्ही महान खेळाडू कसोटीत मोठे टप्पे गाठण्याच्या अगदी जवळ आहेत. विशेष म्हणजे विक्रम रचण्यासाठी दोघांना 10-10 विकेट्सची गरज आहे.

खरे तर, अँडरसन 700 कसोटी बळी घेण्याच्या पराक्रमापासून फक्त 10 विकेट दूर आहे. त्याचबरोबर अश्विनला 500 कसोटी बळींचा टप्पा गाठण्यासाठी 10 विकेट्सचीही गरज आहे. भारतीय फिरकीपटूने आतापर्यंत 95 कसोटी सामन्यांमध्ये 490 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने 34 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. दुसरीकडे, अँडरसनच्या नावावर 183 कसोटी सामन्यांमध्ये 690 विकेट आहेत. अँडरसनने 32 डावात पाच विकेट 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची किमया केली आहे.

41 वर्षीय जेम्स अँडरसन 700 कसोटी बळी घेणारा जगातील तिसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याच्या आधी दोन फिरकीपटूंनाच असा पराक्रम करण्यात यश आले आहे. यात श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांचा समावेश आहे. दुसरीकडे कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठणारा अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज बनेल. अनिल कुंबळे हा भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 132 कसोटी सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. 74 धावांत 10 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (INDvsENG Test Series)

सर्वाधिक कसोटी विकेट घेणारे गोलंदाज

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010) : 133 कसोटी : 800 विकेट्स

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007) : 145 कसोटी : 708 विकेट

3. जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2023) : 183* कसोटी : 690* विकेट

4. अनिल कुंबळे (भारत 1990-2008) : 132 कसोटी : 619 विकेट्स

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023) : 167 कसोटी : 604 विकेट

6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007) : 124 कसोटी : 563 विकेट

7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज 1984-2001) : 132 कसोटी : 519 विकेट

8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया 2011-2023) : 123* कसोटी : 501* विकेट

9. रविचंद्रन अश्विन (भारत 2011-2023) : 95* कसोटी : 490* विकेट

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचाही प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक इशान किशन संघाचा भाग नाही.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा , अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा खूप आधी केली होती. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ यावेळी संपूर्ण तयारीनिशी भारतात येत असून यजमानांसमोर कडवे आव्हान उभे करू शकतो. भारतीय संघ इंग्लंडच्या ‘बेसबॉल’ शैलीला कसा टक्कर देतो या उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे. (INDvsENG Test Series)

Back to top button