

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडने अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. त्याने आक्रमक फलंदाजी आणि घातक गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्नाटककडून खेळताना समितने आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. (Samit Dravid)
मुंबईविरूद्धच्या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीमध्ये समितने 19 षटकांत दोन महत्त्वाचे बळी घेतले. त्याने मुंबईचा धोकादायक फलंदाज आयुष सचिन वर्तकला 73 धावांवर बाद केले. त्यानंतर प्रतीक यादवला 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 19 षटकांमध्ये 60 धावा देत दोन विकेट पटकावल्या. अखेर मुंबईचा संघ 380 धावांवर बाद झाला. समितच्या गोलंदाजीच्या कामगिरीने सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. (Samit Dravid)
समितने मुंबईविरुद्धच्या पहिल्या स्पेलमध्ये 10 षटके टाकली आणि 41 धावा दिल्या. मात्र, त्यानंतर त्याने नऊ षटकांत केवळ 19 धावा देत दोन विकेट घेतल्या. समित गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. त्याने नुकतीच जम्मू-काश्मीरविरुद्ध ९८ धावांची इनिंग खेळली होती. कर्नाटककडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 159 चेंडूत 98 धावा केल्या होत्या. यामध्ये 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. स्पर्धेच्या चालू हंगामात समितने सात सामन्यांत ३७.७८ च्या सरासरीने ३४० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. या 18 वर्षीय खेळाडूने तीन विकेट्सही घेतल्या आहेत.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी नुकतेच त्याचा मुलगा समितला कोचिंग देण्याबाबत आपले मत मांडले होते. यावेळी ते म्हणाले की, 'मी माझा मुलगा समितला प्रशिक्षक करत नाही कारण दोन भूमिका (पालक आणि प्रशिक्षक) साकारणे कठीण आहे. वडील असल्याचा मला आनंद आहे.
हेही वाचा :