Mohammed Shami : मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित | पुढारी

Mohammed Shami : मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंगळवारी भव्य समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या सोहळ्यात क्रिकेटपटू मोहम्मद शमीला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देण्यात आला. यामध्ये खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात आला आहे. यावेळी मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांच्याउत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी देण्यात आला. 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी बॅडमिंटनमध्ये आपले आणि देशाचे पहिले सुवर्णपदक जिंकले. याशिवाय आशियाई चॅम्पियनशिप आणि इंडोनेशिया ओपन सुपर 1000 चे विजेतेपदही पटकावले. ही पुरुष जोडी सध्या मलेशिया ओपन सुपर 1000 मध्ये खेळत आहे आणि त्यामुळे या समारंभाला उपस्थित राहिले नाही. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात 26 खेळाडू आणि पॅरा-अॅथलीट्सना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विश्वचषकात संघाचा हिरो ठरला शमी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या वर्षी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 24 बळी घेतले. 33 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज शमी सध्या घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. याच कारणामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळू शकला नाही.

खेलरत्न विजेत्यांना 25 लाखांचे रोख पारितोषिक दिले जाते, तर अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारासाठी 15 लाखांचे रोख पारितोषिक असते.

नुकतीच बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेल्या आर वैशालीलाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती स्टार ग्रँड मास्टर आर प्रज्ञनंदाची मोठी बहीण आहे.

कोनेरू हंपी आणि द्रोणवल्ली हरिका यांच्यानंतर ग्रँड मास्टर बनणारी वैशाली ही देशातील तिसरी महिला खेळाडू आहे.

युवा पिस्तुल नेमबाज 19 वर्षीय ईशा सिंग देखील जकार्ता येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे समारंभास उपस्थित राहू शकली नाही. तिने सोमवारी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.

या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या इतर दिग्गज खेळाडूंमध्ये माजी ज्युनियर विश्वविजेता आणि गतवर्षीचा वरिष्ठ चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अनंत पंघल, गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेतील कांस्यविजेता बॉक्सर मोहम्मद हुसमुद्दीन आणि पॅरा तिरंदाज शितल देवी यांचा समावेश आहे.

2023 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –

 

2023 साठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी (बॅडमिंटन).

अर्जुन पुरस्कार : ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), मुरली श्रीशंकर (अॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल ( घोडेस्वारी), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेस), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), आनंद पंघल (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (कुस्ती) वुशू). ), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), इलुरी अजय कुमार रेड्डी (दृष्टीहीन क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब).

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी) : जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंत कुमार पुशीलाल (टेबल टेनिस).

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : मंजुषा कंवर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी).

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2023 : गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर (एकूण विजेता विद्यापीठ), लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब (पहिला उपविजेता), कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र (दुसरा उपविजेता).  (Mohammed Shami)

हेही वाचा :

Back to top button