U-19 Asia Cup : भारत आशिया चषकातून बाहेर | पुढारी

U-19 Asia Cup : भारत आशिया चषकातून बाहेर

दुबई ; वृत्तसंस्था : भारताच्या युवा संघाला आज 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. बांगला देशने 4 विकेटस्ने राखून विजय मिळवताना स्पर्धेत आश्चर्यचकित निकालाची नोंद केली. बांगला देशच्या अरिफूल इस्लाम व अहरार आमीन यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताचा पराभव पक्का केला. तर दुसर्‍या उपांत्य सामन्यात यूएईने पाकिस्तानचा धक्कादायक पराभव केला. (U-19 Asia Cup)

स्पर्धेत दबदबा राखणार्‍या भारतीय संघाच्या फलंदाजांना उपांत्य फेरीत अपयश आले. आदर्श सिंग (2), अर्शिन कुलकर्णी (1), कर्णधार उदय शहरन (0) यांना एकेरी धावसंख्येवर माघारी जाण्यास भाग पाडले. मरूफ मृधाने या तिघांनाही तंबूची वाट दाखवली. प्रियांशू मोलिया (19) व सचिन धस (16) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला; परंतु डॉलाह बोर्सनने दोघांनाही माघारी पाठवले. मुंबईचा मुशीर खान एका बाजूने संयमी खेळ करताना दिसला आणि त्याला मुरुगन अभिषेकची साथ मिळाली. मुशीरने 61 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या, तर मुरुगनने 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 62 धावा केल्या. या दोघांच्या विकेटनंतर भारताचा संपूर्ण संघ 42.4 षटकांत 188 धावांत तंबूत परतला. बांगला देशकडून मरुफने 4, बोर्सन व शेख जिबॉन यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. (U-19 Asia Cup)

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगला देशची अवस्थाही 3 बाद 34 अशी झाली होती. पण, अरिफूल इस्लामने 90 चेंडूंत 94 धावांची खेळी केली, तर आमीनने 101 चेंडूंत 44 धावा केल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीने भारताला स्पर्धेबाहेर फेकले. बांगला देशने 42.5 षटकांत 6 बाद 189 धावा करून विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा :

Back to top button