लंबू-टिंगूची ‘ती’ अविस्मरणीय भेट! | पुढारी

लंबू-टिंगूची ‘ती’ अविस्मरणीय भेट!

लंडन : अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रीत झालेले ‘लंबूजी लंबूजी… बोलो टिंगूजी’ हे ‘कुली’ चित्रपटातील गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्याची आठवण अनेकांना जगातील सर्वात उंच आणि बुटक्या व्यक्तींची भेट झाल्यावरही आली होती. 2014 मध्ये ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस् डे’च्या निमित्ताने 8 फूट 2.8 इंच उंचीचा सुल्तान कोसेन आणि अवघ्या 55 सेंटीमीटर म्हणजेच एक फूट 8 इंच उंचीच्या चंद्रबहाद्दूर डांगी यांची ही भेट होती. अर्थातच ती अविस्मरणीय झाली आणि आताही या दोघांचा त्यावेळेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

तुर्कियेचा सुल्तान कोसेन हा जगातील सर्वात उंच व्यक्ती आहे. 10 डिसेंबरला त्याने आपला 41 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये तो चंद्र बहाद्दूर डांगी यांच्यासोबत दिसून येतो. सुल्तानच्या नावावरील विक्रम 2009 पासून अबाधित आहे. नेपाळमधील चंद्र बहाद्दूर डांगी यांच्या नावावर जगातील सर्वात बुटकी व्यक्ती होण्याच्या विक्रमाची नोंद झाली होती. 1 फूट 8 इंच उंचीच्या चंद्र बहाद्दूर यांचे वजन केवळ चौदा किलो होते.

त्यांच्या नावे दोन विक्रमांची नोंद होती. पहिला म्हणजे ‘जगातील सर्वात बुटका प्रौढ माणूस’ म्हणून तर दुसरा विक्रम गेल्या 57 वर्षांमधील ‘सर्वात बुटकी व्यक्ती’ अशी नोंद होती. नेपाळची राजधानी काठमांडूपासून सुमारे 400 किलोमीटरवर रिमखोली गावात ते राहत होते. 2015 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सध्या सुल्तान आणि चंद्र बहाद्दूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

Back to top button